पंतप्रधान बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर त्यांनी शरद पवारांचं स्वागत केलं आणि पहिल्याच शब्दात त्यांनी पवारांचं कौतुक केलं होतं. शरद पवारांचं आयुष्य पाहून असं वाटतं, की त्यांची नजर जिथे जाईल त्या सर्व ठिकाणांवरुन त्यांना सलामच येईल, असं मोदी त्यावेळी म्हणाले होते. पाच दशकांहून अधिक काळ अखंड एकनिष्ठ साधना हेच या मागचं कारण असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
मोदींनी पुढे बोलताना सांगितलं, की आपण वन लाइफ, वन मिशन असं म्हणतो, पण त्यात स्वतःला झोकून देणं सोपं नाही. स्वातंत्र्यानंतर आणि विशेषत: ७० च्या दशकानंतर देशात जी नेतृत्व बाहेर येत आहेत ती राजकीय चळवळीतून येत आहेत. पण शरद राव हे सर्जनशील कार्याच्या पोटातून जन्मलेले राजकारणी आहेत. मी अतिशय जवळून पाहिलं आहे, की शरद राव अधिकतर वेळ सर्जनशील कामात देतात. आजही कोणी बारामतीला जाऊन पाहिलं, तर चारही बाजूला काही ना काही सर्जनशील कामात शरद पवारांचं कुटुंब असल्याचं दिसेल.
शरद पवार हे सर्वांसाठी एक उदाहरण आहेत. ते ज्यावेळी एका उंचीवर पोहोचले होते, त्यावेळी आम्ही गल्ली-गल्लीतून जात होतो. त्यावेळी आम्ही त्यांच्याबाबत ऐकत होतो. गुजरात आणि महाराष्ट्राचं जवळचं नातं आहे. एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. एक काळ असा होता, ज्यावेळी अंडरवर्ल्डने मुंबईला उद्धवस्त केलं होतं. त्यावेळी शरद पवारांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं, मुंबईला त्यांनी यातून बाहेर काढलं. ही त्यांची ताकद होती असंही पंतप्रधान त्यावेळी म्हणाले होते.