• Sat. Mar 14th, 2026
    कार्यकर्त्यांना दादांनी खडसावलं, पवार म्हणाले, माझा निर्णय झालाय, जावई-नातासह पवार घराकडे

    मुंबई : साहेब तुमच्याकडे बघून आम्ही राजकारणात आलो, मतं मागितली, मंत्री झालो, आमदार झालो, पण या सगळ्यांना घडवणारा नेताच जर पक्षाध्यक्ष राहणार नसेल, तर आम्ही कुणाकडे बघायचं, अशी सगळ्याच नेत्यांनी एकसुरी खंत व्यक्त करत ज्येष्ठ नेते शरद पवारांची मनधरणी केली. तब्बल दीड तास वाय बी चव्हाण सेंटरमध्ये कार्यकर्ते नेते शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. अजित पवार-प्रफुल्ल पटेल भावनिक कार्यकर्त्यांची समजूत काढत होते, कधी दटावत होते. पण पवार आपल्या निर्णयापासून मागे येत नव्हते. माझा निर्णय झालाय, सक्रीय राजकारणातून जरी बाजूला जाणार असलो तरी पक्षापासून बाजूला जाणार नाही, लोकांपासून वेगळं राहणार नाही, असा शब्द भावुक कार्यकर्त्यांना देत शरद पवार सिल्वर ओककडे रवाना झाले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर कार्यकर्त्यांनी पवारांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते गाडीसमोर झोपले. पण पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत शरद पवार यांच्या गाडीचा रस्ता रिकामा केला. शरद पवार जावई सदानंद सुळे आणि नातू विजय यांच्यासह गाडीत बसून सिल्वर ओककडे रवाना झाले.Sharad Pawar : भाकरी फिरवण्याची सुरुवात स्वत:पासून, निवडणुकीला उभे राहणार नाही, अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार
    गेली ५६ वर्ष संसदीय राजकारण गाजविणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेचा दुसरा भाग आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे प्रसिद्ध झाला. या पुस्तकाच्या अनावरण सोहळ्याला पवारांसह राष्ट्रवादीचे सगळे नेते उपस्थित होते. याचवेळी मी आता राजकारातून निवृत्ती घेतोय, पण पक्षाच्या कामात असेल, लोकांपासून दूर जाणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा करेन, असं शरद पवार म्हणाले. त्यांचं भाषण संपताच कार्यकर्त्यांनी एकच गलका केला. आपण निर्णय मागे घ्या, अशी विनंती कार्यकर्ते करु लागले. नेत्यांनी समजावून झालं. भावनिक भाषणं झाली. पण पवार काही केल्या ऐकायला तयार नव्हते.

    VIDEO: आमचे सगळ्यांचे राजीनामे घ्या, पण तुम्ही बाजूला जाऊ नका, जयंत पाटील धायमोकलून रडले
    दुसरीकडे पवार आपल्या मतावरुन मागे हटत नसल्याचं पाहून राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतलाय. साहेब जोपर्यंत आपला निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही अन्न पाणी त्यागू, असं राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भावुक होऊन सांगितलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

    वाय बी चव्हाण सेंटरमध्ये सध्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीला प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ असे नेते उपस्थित आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed