• Mon. Nov 25th, 2024

    शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बि-बियाणे, खते मिळण्यामध्ये अडचण होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री अतुल सावे

    ByMH LIVE NEWS

    May 1, 2023
    शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बि-बियाणे, खते मिळण्यामध्ये अडचण होणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री अतुल सावे

    बीड दि. 1 मे (जि.मा.का.):- जिल्‍हास्‍तरावरील सन 2023 मधील खरीप हंगाम पूर्व तयारी व नियोजनाबाबत सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी कृषी विभागाशी संबंधित सर्व यंत्रणांच्या कामकाजाचा व तयारीचा आढावा घेतला.  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज यासंदर्भातील बैठकीचे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्‍यात आले होते.

    या बैठकीला खासदार प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळुंके, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके आदी उपस्थित होते.

    पालकमंत्री अतुल सावे म्हणाले, येत्‍या खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्‍यक असलेले बी-बीयाणे, खताचा पुरवठा या महत्‍वाच्‍या बाबींचे नियोजन करून त्‍यांना कोणतीही अडचण येणार नाही याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी.  शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी पीककर्जाची अत्यंत निकड असते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळेल, यासाठी सर्व बँकांना सूचना देण्याचे निर्देश देत ग्रामपातळीवर शेतकऱ्यांकडून पीककर्जाचे अर्ज भरुन घेत ते बँकांकडे वर्ग करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

    शेतकऱ्यांच्या शेतीला वीजपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत पंपाच्या जोडणीची कामे वेगाने करत केंद्र शासनाच्या कुसूम योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

    एक रुपया प्रीमियम भरून शेतकऱ्यांना पिकविमा भरण्याची योजना शासनाने सुरु केली असून या योजनेची जिल्हाभरात सर्वदूर प्रचार-प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

    बैठकीस उपस्थित लोकप्रतिनिधींनी खरीप हंगाम नियोजनाच्यादृष्टीने उपयुक्त्‍ अशा सूचना केल्या.

    बैठकीच्या सुरूवातीला जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जेजुरकर यांनी खरीप हंगामपूर्व तयारी व नियोजनाचा आढावा सादर केला.

    यावेळी जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या शेतकऱ्यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध माहितीपुस्तिकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचनही करण्यात आले.

    बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed