• Sun. Sep 22nd, 2024

उस्मानाबाद पोलीस दल झाले अधिक गतिमान; अद्ययावत वाहनांच्या ताफ्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ByMH LIVE NEWS

May 1, 2023
उस्मानाबाद पोलीस दल झाले अधिक गतिमान; अद्ययावत वाहनांच्या ताफ्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

उस्मानाबाद,दि.01(जिमाका):कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारी यंत्रणा अद्ययावत आणि गतिमान राहण्याच्या तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसविण्याबरोबरच जनतेच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलाला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने पोलीस दलाच्या ताफ्यात आता नवीन अद्ययावत वाहने सामील झाली आहेत.त्यामुळे जिल्हा पोलीस दलाचे मी अभिनंदन करतो, तसेच येथील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक हिरकणी कक्ष लवकरच स्थापन होणार असून याठिकाणी आरोग्य सेवक किंवा परिचारिकाची नियुक्तीही करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील कवायत मैदान येथे पार पडलेल्या वाहनांच्या लोकार्पण प्रसंगी केले.

पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी पोलीस दलाला अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी नवीन मिळालेली वाहने अधिक उपयुक्त ठरतील असे सांगितले. पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय येथे पार पडलेल्या या लोकार्पणप्रसंगी , जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजभाऊ गलांडे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, आदी मान्यवर उपस्थित होते.

उस्मानाबद  जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजन समिती  यांच्या निधीतून नव्याने प्राप्त झालेल्या वाहनांचे आज पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 34बोलेरो निओ,2 एस एम एल लाइट वॅन, एक फोर्स कंपनी लाईट वॅन, व 10 दुचाकी गाड्या मिळालेल्या आहेत. उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलास मिळालेल्या या अद्यावत वाहनामुळे पोलीस विभागातर्फे केले जाणारे दैनंदिन कर्तव्य ज्यामध्ये गुन्हे तपास, रात्रगस्त, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त इत्यादी कामकाज तसेच आपत्कालीन परस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी तात्काळ पोहचून आपले कर्तव्य अधिक गतीने बजावण्यासाठी मदत होणार असुन आणखीन 01 इनोवा क्रिस्टा 02 स्कॉर्पियो 01 वॉटर टँकर, 04 आयशर बस इ. समाविष्ट होणार आहे.या नवीन वाहनांचा वापर जिल्ह्यातील गुन्हे नियंत्रण , जनतेची मदत व सुरक्षेसाठी अधिक उपयोग होईल, पोलीस दलाच्या कामकाजाला या अद्ययावत व सुसज्ज वाहनांनी गती मिळेल असे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले व जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed