• Sun. Sep 22nd, 2024

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सायबर पोलीस ठाणे, वायरलेस टॉवर, थर्ड आय प्रणालीचे उद्घाटन

ByMH LIVE NEWS

May 1, 2023
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सायबर पोलीस ठाणे, वायरलेस टॉवर, थर्ड आय प्रणालीचे उद्घाटन

पालघर दि. 01 : महाराष्ट्र दिनाचे 63 वे वर्धापन दिनाचे औचित्य साधून पालघर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सायबर पोलीस ठाणे,  वायरलेस टॉवर तसेच थर्ड आय प्रणाली यांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावीत, सर्वश्री आमदार सुनिल भुसारा, श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट उपस्थित होते.

सायबर पोलीस ठाणे : संपूर्ण भारतात तसेच महाराष्ट्रात सायबर क्राईमचे गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. फेसबुकवरून मैत्री करून फसवणूक करणे, नोकरी देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करणे, इनकम टॅक्स भरणे किंवा लाईट बील भरणे बाकी असल्याचे सांगून लिंक पाठवून फसवणूक करणे, एटीएम कार्डची माहिती विचारून फसवणूक करणे, तसेच इतर प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना आळा घालणेकरीता व सायबर गुन्ह्यांचा जलद गतीने तपास करण्याकरीता शासनाच्या आदेशान्वये पालघर पोलीस दलाकरीता पोलीस अधिक्षक कार्यालय येथे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले.

वायरलेस टॉवर : दि.01 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून नवीन पालघर जिल्हा निर्माण करण्यात आला. पालघर जिल्हा पोलीस दलाचे कार्यक्षेत्रात 7 तालूक्याअंतर्गत 814 गावे व 2974 पाडे आहेत. पालघर जिल्हा हा सागरी व डोंगरी भागाने व्यापलेला आहे. वादळवारा व पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यास आपत्तीच्या काळात सर्व दळणवळण यंत्रणा बंद पडू शकतात. अशा आपत्ती व्यवस्थापनवेळी शास्वत पर्याय म्हणून चांगली दळणवळण यंत्रणा असणे आवश्यक आहे. याकरीता पालघर जिल्ह्यात एकूण तीन ठिकाणी वायरलेस टॉवर उभारण्यात आले. i) महालक्ष्मी डोंगर ii) मोखाडा येथील सुर्यमाळ iii) पोलीस अधिक्षक कार्यालय.

पोलीस अधिक्षक कार्यालय येथील टॉवर टाटा कंपनीच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आला असून इतर दोन ठिकाणचे टॉवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून प्राप्त झालेल्या 19 लाख रुपये निधीतून उभारण्यात आले आहे. सदर उभारण्यात आलेल्या टॉवरच्या माध्यमातून सर्व पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात फिरणारी सर्व वाहने 100 टक्के क्षमतेने या दळणवळण कार्यपध्दतीचा वापर करणार आहेत.

थर्ड आय प्रणाली : पालघर जिल्हा पोलीस दलात आधुनिक तंत्रज्ञानाचा दैनंदिन कामकाजात वापर करावा याकरिता पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून थर्ड आय अॅप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आली आहे. मनुष्यबळाचा सुयोग्य वापर कमीतकमी पेपर वर्क, स्मार्ट पेट्रोलींग, गुन्हे विश्लेषन हे सोप्या पध्दतीने होणार आहे. पेट्रोलींग करताना पोलीस विभागातील सर्व प्रकारची कर्तव्य अत्यंत प्रभावीपणे राबवणे सहज शक्य होणार असून गुन्हेगारी नियंत्रणासाठी त्याचा प्रभावी वापर होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी क्यू आर कोड बसवण्यात येणार आहे. त्यामुळे सदर ठिकाणी प्रभावी पोलीस गस्त होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed