एमएमआरडीएमधील सूत्रांनुसार, मार्गिकेतील बांधकामासंबंधीची उभारणी ६६ टक्के पूर्ण झाली आहे. मात्र कारशेडसाठी कांजूरची जमीन मिळाल्याने आता पुढील हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे अन्य सुविधांची कामे आता लवकरात लवकर सुरू होणार आहे. त्याअंतर्गत स्थानकांवरील प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स, संवाद प्रणालीशी संबंधित साहित्य मागविण्याचे काम सुरू झाले आहे. याखेरीज गाडी नियंत्रण कक्ष, सिग्नल यंत्रणेसंबंधीची कामेदेखील सुरू होणार असल्याने ते साहित्यदेखील मागविले जाणार आहे. त्यासाठी लवकरच निवीदा जारी केली जाईल.
या प्रकल्पात उन्नत प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पुलाची उभारणी ७१ टक्के पूर्ण झाली आहे. तर यावरील १३ स्थानकांची उभारणी ५१.५० टक्के पूर्ण झाली आहे. यानुसार प्रकल्प सरासरी ६६ टक्के पूर्ण झाला आहे. उर्वरित कामे १८ महिन्यात पूर्ण होतील, असे नियोजन प्राधिकरण करीत आहे.
तीन मजली उड्डाणपूल
या मेट्रो मार्गिकेवर तीन मजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. अंधेरी पश्चिमेच्या लोखंडवालाजवळील एसएस नगर ते जेव्हीएलआरवरील पूनम विहारपर्यंत एकूण ४.७५० किमी लांबीचा उड्डाणपूल असेल. त्यापैकी २.५८ किमीवर रस्ता, त्यावर वाहनांसाठीचा उड्डाणपूल, मेट्रोचे स्थानक व त्यावर मेट्रो मार्गिका असेल. या सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या कामासाठी एमएमआरडीएने याआधीच निविदा काढली आहे. अशा प्रकारचा उड्डाणपूल राज्यात नागपूरमध्ये याआधीच कार्यान्वित झाला आहे.
कशी आहे ‘मेट्रो ६’?
एकूण लांबी : १५.३१ किमी
स्थानके : १३
खर्च : ६,७७२ कोटी रुपये
कामाला सुरुवात : २०१८
कारशेड : कांजूर येथे १५ हेक्टरवर
संलग्रता : मेट्रो २ अ, मेट्रो ७, मेट्रो ३, मेट्रो ४, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे