तोफखाना रेजिमेंट हे लष्कराचे एक प्रमुख लढाऊ अंग आहे आणि त्यात सुमारे २८० तुकड्या आहेत. यात बोफोर्स हॉवित्झर, धनुष, एम-७७७ हॉवित्झर आणि के-९ वज्र स्वयंचालित तोफांसह विविध तोफांची प्रणाली हाताळली जाते. ‘या महिला अधिकाऱ्यांना सर्व प्रकारच्या प्रमुख तोफखाना तुकड्यांमध्ये नियुक्त केले जाणार असून, तिथे त्यांना रॉकेट, फील्ड आणि लक्ष्याची टेहळणी करण्याची (सॅटा) प्रणाली; तसेच आव्हानात्मक परिस्थितीत प्रमुख उपकरणे हाताळण्याचे पुरेसे प्रशिक्षण मिळेल,’ असे सूत्रांनी सांगितले.
लेफ्टनंट सैनी यांचा सॅटा रेजिमेंटमध्ये, लेफ्टनंट दुबे आणि लेफ्टनंट यादव यांचा फील्ड रेजिमेंटमध्ये, लेफ्टनंट मुदगील यांचा मध्यम पल्ल्याचा मारा करणाऱ्या तोफांच्या तुकडीमध्ये (मीडियम रेजिमेंट) आणि लेफ्टनंट आकांक्षा यांचा रॉकेट रेजिमेंटमध्ये समावेश करण्यात आला आहे. ‘तोफखाना रेजिमेंटमध्ये महिला अधिकारी दाखल होणे (कमिशनिंग) हे भारतीय सैन्यात सुरू असलेल्या परिवर्तनाची मोठी साक्ष आहे,’ असे सूत्रांनी सांगितले. जानेवारीमध्येच लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी तोफखाना तुकड्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय जाहीर केला. नंतर हा प्रस्ताव सरकारने मंजूर केला. यानंतर प्रथमच, भारतीय लष्कराने आपल्या तोफखाना रेजिमेंटमध्ये पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे.