अधिकाऱ्याच्या मृत्यूवेळी त्यांच्यावर मुलाच्या संगोपनाची जबाबदारी होती. त्यांनी मुलाला शिक्षणासाठी पाचगणी (जि. सातारा) येथील शाळेत घातले होते. वडिलांच्या अकाली मृत्यूने त्या मुलाचा पाचगणीच्या शाळेतील प्रवेश रद्द करावा लागला. दरम्यान, जन्मदात्या आईने आपल्या मुलाला सवतीने आणि तिच्या मुलींनी पळवून नेलेला असून, त्याचा ताबा मिळावा, असा तक्रार अर्ज पोलिसांकडे दिला. त्यावर सावत्र आईने मुलाचा ताबा जन्मदात्या आईकडे देण्याची तयारी दर्शवलीही; मात्र त्या वेळी जन्मदात्या आईने आर्थिक कारण देऊन मुलाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्या मुलाला अनाथ आश्रमात भरती करण्याची वेळ आली.
ही बाब समजताच सावत्र आईने स्वतःहून त्या मुलाचे पालकत्व मिळावे म्हणून ॲड. हेमंत झंजाड यांच्यामार्फत न्यायालयामध्ये अर्ज केला. मुलाची जन्मदाती आई लहान त्या मुलाचा सांभाळ करण्यास सक्षम नसून, सावत्र आई सक्षम असल्याचे ॲड. झंजाड यांनी पुराव्यासह न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून मुलाच्या संगोपनाची जबाबदारी सावत्र आईकडे सोपवली.