• Sat. Sep 21st, 2024

मालाड पश्चिमेतील वाहतूककोंडी फुटणार, रेल्वे स्थानक परिसरातील ज्वेलरी, फिश मार्केट भुईसपाट

मालाड पश्चिमेतील वाहतूककोंडी फुटणार, रेल्वे स्थानक परिसरातील ज्वेलरी, फिश मार्केट भुईसपाट

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मालाड रेल्वे स्थानक परिसरातील एम. एम. मिठाईवाला दुकानासह ज्वेलरी मार्केट, फिश मार्केट अशी १९ अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत. पालिकेच्या पी उत्तर विभागाचे शुक्रवारी केलेल्या या कारवाईमुळे रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, मालाड पश्चिमेतील वाहतूककोंडीची समस्या दूर झाली आहे.मालाड स्थानकाबाहेरील आनंद मार्गावर अवैध फेरीवाले आणि दुकानांनी रस्त्यावर अतिक्रमण केले होते. या रस्त्यांवरून दररोज एक लाख २० हजार पादचाऱ्यांची ये-जा असते. अनधिकृत दुकानांमुळे पादचाऱ्यांना होणारी अडचण आणि अपघाताची शक्यता लक्षात घेता, पालिकेने अनधिकृत दुकाने जमीनदोस्त केल्याचे पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. परिमंडळ-४चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत १५ पालिका अभियंता, चार पोकलेन मशिन, दोन जेसीबी, चार डंपरचा वापर करण्यात आला. पालिकेचे ४० कामगार व कडेकोट पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

रस्ता २० फूट रुंद होणार

उपनगरीय स्थानकाला लागून असलेल्या या परिसरातील बांधकामांमुळे रस्त्यावर नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेता, पी/उत्तर विभागाने याठिकाणी रस्ते रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या रुंदीकरण रेषेमध्ये एकूण १९९ बांधकामे अडथळा ठरत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १९ दुकानांवर कारवाई झाली. यामुळे रस्ता सुमारे १५ ते २० फूट रूंद करणे शक्य झाले आहे, अशी माहिती पालिकेने दिली.

कोणाच्या घरी गर्भवती महिला,कोणाच्या घरी वृद्ध; जेसीबी चालला अन् क्षणात सगळे बेघर; काळीज पिळून टाकणारा आक्रोश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed