निर्मल लाइफस्टाइलच्या वतीने मुलुंड परिसरात ऑलींपिया, ओमेगा, पॅनोरमा आणि निर्मल वन स्पिरिट असे टॉवर बांधण्याची जाहिरात दिली होती. त्यानुसार ग्राहकांनी या प्रोजेक्टमध्ये घरांची बुकिंग करण्यास सुरुवात केली. २०११पासून प्रत्यक्षात बांधकाम सुरू होणार असून, २०१७ मध्ये घरांचा ताबा देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, २०२२पर्यंत घरे न मिळाल्याने सुमारे ३३ ग्राहकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. या प्रकरणी फसवणुकीची रक्कम ११ कोटी रुपये असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तपासादरम्यान धर्मेश जैन आणि राजीव जैन यांनी दिलेल्या वेळेत घरे न देऊन ग्राहकांची फसवणूक केल्याचे दिसून आले. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने निर्मल लाइफस्टाइल कंपनी, तसेच धर्मेश जैन आणि राजीव जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या तपासामध्ये जैन यांनी फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना गुरुवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने धर्मेश जैन आणि राजीव जैन या दोघांना ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी अद्याप दोघांकडून कोणतीही रक्कम वसूल केली नसून, त्यांची चार बँक खाती तपासामध्ये समोर आली आहेत. त्यांच्या चौकशीमध्ये, तसेच तपासामध्ये जी माहिती समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटले आहे.