• Sat. Sep 21st, 2024
राज्यात भूकंप? कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी मंत्री राहीन की नाही माहिती नाही…!

नागपूर :सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सध्याचं शिंदे फडणनीस सरकार कोसळणार, असे आरोप दररोज विरोधी पक्ष करतो आहे. तशी शक्यता अनेक नेते बोलून दाखवत आहेत. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. अशा सगळ्या चर्चा सुरु असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या आणि सरकारच्या भवितव्याबाबत मोठे विधान केले आहे. मी किती दिवस कृषिमंत्री राहीन, हेही मला माहीत नाही, असं म्हणून राज्यात भूकंप होणार असल्याच्या चर्चांना त्यांनी खतपाणीच घातलं. दुसरीकडे आज सकाळीच त्यांनी विखेंच्या मुख्यमंत्रिपदावर बोलताना मित्र मोठा झालेलं पाहायला आवडेल, असं वक्तव्य करुन मुख्यमंत्रिबदलाच्या चर्चांना हवा दिली होती.

कृषिमंत्री सत्तार गुरुवारी नागपुरात पोहोचले. जिथे त्यांनी वनामतीत खरिपाच्या पेरणीसंदर्भात नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहभागी झाले. अधिकाऱ्यांना संबोधित करताना कृषिमंत्र्यांनी काही राजकीय विधाने केली.

मंत्री राहिल की नाही माहिती नाही… सत्तारांना कशाची कुणकुण लागलीये?

अधिकाऱ्यांना संबोधित करताना कृषिमंत्री म्हणाले, “प्रत्येक जिल्हादंडाधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांनी आपली जबाबदारी पार पाडत एकत्रितपणे काम करण्याचे ठरवले असून, शासनाची जी काही योजना आहे, ती अमलात आणायची आहे, ती होईलच. कृषी विभागाने केलेल्या कामांची माहिती घेतली आणि आम्ही काही उद्दिष्टे निश्चित केले आहेत. पुढच्या खरिपाच्या पेरणीच्या वेळी मी कृषिमंत्री राहिल की नाही याची शाश्वती नाही. पण तुम्ही अधिकारी राहाल. योजना चांगल्या राबवा. सरकारमध्ये असलं सुरुच असतं… सरकार येत-जात असते. मात्र अधिकाऱ्याने केलेले काम केवळ त्यांच्या नावाशी जोडलेले असते”.

सत्तार यांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडणार की काय, अशा चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याचा संबंध राजकीय पंडितांकडून सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या १६ आमदारांवरील आगामी निर्णयाशी जोडला जात आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या विरोधात येणार हे शिंदे गटाच्या आमदारांनीही मान्य केल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed