भेंडवळच्या घट मांडणीला शास्त्रीय आधार नाही, अंनिसची भूमिका
अंनिसचे संघटक रघुनाथ कौलकार यांनी भेंडवळच्या घट मांडणीतील अंदाज हे कोणत्याही शास्त्री आधाराशिवाय काढलेले आहेत. भेंडवळची घट मांडणी म्हणजे निव्वळ पोपटपंची म्हणून ही भाकित सांगितली जातात. शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवू नये. अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या २५ वर्षांपासून याचा अभ्यास करत आहे. कितीतरी भाकित चुकीची ठरतात, लॉ ऑफ प्रॉबिलिटी नुसार काही भाकित खरी ठरतात त्याचा उदो उदो केला जातो. राज्यातील शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवू नये, असं आवाहन रघुनाथ कौलकार यांनी केली आहे.
भेंडवळच्या घट मांडणी शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये : रघुनाथ कौलकार
रघुनाथ कौलकार यांनी शेतकऱ्यांना भेंडवळच्या घट मांडणीतून केल्या जाणाऱ्या भाकितांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं. भेंडवळच्या घट मांडणीत पावसासंदर्भात, राजकारणासंदर्भात अंदाज व्यक्त केले जातात. पावसाचा संबंध थेट शेतकऱ्यांशी असल्यानं रघुनाथ कौलकार यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.
भेंडवळच्या घट मांडणीच्या अंदाजात काय?
शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील ” भेंडवळच्या घट मांडणी ” चे अंदाज काल जाहीर करण्यात आले आहे. घट मांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडलेली होती. जूनमध्ये कमी पाऊस असेल, जुलैमध्ये सर्वसाधारण पाऊस असेल आणि ऑगस्टमध्ये चांगला पाऊस आणि अतिवृष्टी होईल तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस पडून पिकांचं नुकसान होऊ शकतं, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.