• Sat. Sep 21st, 2024

पर्यावरण संवर्धनाबरोबर शाश्वत विकासासाठी इंधन बचत ही काळाची गरज – मंत्री रवींद्र चव्हाण

ByMH LIVE NEWS

Apr 24, 2023
पर्यावरण संवर्धनाबरोबर शाश्वत विकासासाठी इंधन बचत ही काळाची गरज – मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. २४ : “देशाची ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी इंधन बचत ही काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन इंधन बचतीसाठी सर्वच स्तरांवर जनजागृती होणे गरजेचे आहे”, असे मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर व्हावा, यासाठी  पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA), पेट्रोलियम, नैसर्गिक मंत्रालय आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-२०२३) चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी  मंत्री श्री. चव्हाण  बोलत होते.

यावेळी बीपीसीएलचे कार्यकारी संचालक अनिलकुमार पी, इंडियन ऑइलचे प्रादेशिक व्यवस्थापक अजित धक्रास, राजीव श्रेष्टा, एचपीसीएलचे व्यवस्थापक अकेला वि.ऐन.एस. के. लक्ष्मणराव, गेलचे व्यवस्थापक शंतनू बासू, पीसीआरएचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, ‘सक्षम २०२२’ मध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली आहे. इंधन बचत या उपक्रमांतर्गत राज्यात सर्वाधिक कार्यक्रम करून देशात सर्वोच्च स्थान पटकावले, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्धी करा इंधन बचतीचा संदेश घरोघरी पोहोचवा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हे देखील घरोघरी पोहोचवले असून याच धर्तीवर ‘ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे’ या उपक्रमाची राज्यभरात प्रचार व प्रसिद्धी उपक्रम  राबवावेत. नव्या पिढीला ही आव्हाने समजली पाहिजेत, असेही मंत्री चव्हाण म्हणाले.

इंधन बचतीवर जनजागृतीपर विविध  नाटिकांचे सादरीकरण यावेळी विद्यार्थ्यांनी केले. तसेच विविध वादविवाद स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

तेल उद्योगाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक संतोष निवेंदकर म्हणाले, की  २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत ‘ऊर्जा संरक्षण नेट झीरोच्या दिशेने’ या टॅग लाईनसह संरक्षण क्षमता महोत्सव ‘सक्षम-२०२३’ चे आयोजन केले  असून, सक्षम-२०२३ अंतर्गत राज्यात पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) यांच्यामार्फत विविध १०००  पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अतिरिक्त संचालक नंदन गजभिये यांनी आभार मानले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed