आशिष देशमुख हे आज सकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील कार्यालयात दाखल झाले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र बसून चहा घेत चर्चाही केली. आशिष देशमुख हे बावनकुळे यांच्या कार्यालयात तब्बल अर्धा ते पाऊणतास होते. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. मात्र, सावनेर आणि काटोलमध्ये भाजपला तगडा उमेदवार हवा आहे. आशिष देशमुख हे भाजपसाठी फायद्याचे ठरू शकतात. त्यामुळे भाजपनेही देशमुख यांच्या दिशेने हात पुढे केला आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून या भेटीचे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत.
फक्त मित्राची भेट
या भेटीनंतर आशिष देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बावनकुळे हे आमच्यासोबत आमदार होते. मंत्री होते. आमचे त्यावेळचे ऊर्जावान ऊर्जा मंत्री होते. नागपूरसाठी पालकमंत्री म्हणुन त्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे. नागपूरच्या कोराडी येथील कार्यालयात त्यांनी मला नाश्त्यासाठी बोलावलं. त्यासाठी मी आलो होतो. बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असले तरी आमचे जीवलग मित्र आहेत. ते विधानपरिषदेत आमदार आहेत. त्यामुळे काही कामे असू शकतात. त्यांनी नाश्त्याला बोलावलं होत, म्हणून आलो आहे.याला काही राजकीय अर्थ लावू नये. काँग्रेस पक्षाचा माझ्यावर अजून विश्वास आहे जसा पक्ष ठरवेल तसं मी काम करेल. ही भेट फक्त आणि फक्त औपचारिक आहे, असे आशिष देशमुख यांनी म्हटले.
मी काँग्रेस पक्षात आहे. पक्षाच्या शिस्तभंग समितीच्या नोटिशीला उत्तर देऊन इतके दिवस उलटल्यानंतरही माझ्यावर पक्षाकडूनकोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावरुन माझे म्हणणं पक्षाला पटलं आहे असंही देशमुख यांनी सांगितले. तसेच मला पक्षातून काढण्याची कारवाई ते करणार नाहीत. त्यामुळे इतरत्र कोणत्याही पक्षाकडे जाण्याचा प्रश्न आता उद्भवत नाही असंही आशिष देशमुख यावेळी म्हणाले.
काँग्रेसमधून निलंबन, देशमुखांचा भविष्याचा प्लॅन ठरला, आता विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढवणार