• Sat. Sep 21st, 2024
सहकारी सैनिकाना वाचवताना वाशिमचा जवान शहीद, अमोल गोरेंना चिमुकल्याकडून मुखाग्नी

वाशिम: अरुणाचल प्रदेशातील कमेंग व्हॅली येथे भारत-चीन सीमेवर देशाच्या रक्षणार्थ तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलातील पॅरा रेजिमेंटचे कमांडो अमोल गोरे यांना १७ एप्रिल रोजी वीरमरण आले. वाशिमजवळील सोनखास येथील सुपुत्र शहीद अमोल गोरेंचे पार्थिव पुणे येथून आज सैन्याच्या वाहनाने वाशिमला आणण्यात आले. शहीद गोरेंचे पार्थिव शहराच्या सीमेजवळ येताच रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या नागरिकांनी ‘शहीद अमोल गोरे अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘जब तक सुरज चाँद रहेगा, अमोल तेरा नाम रहेगा’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्याने परिसर देशभक्तीमय झाला होता. वाशिम शहरातील मुख्य मार्गांनी शहीद अमोल गोरेंचे पार्थिव जात असताना नागरिकांनी पार्थिवावर पुष्पांची उधळून करून श्रद्धांजली अर्पण केली.शहीद अमोल गोरे यांना श्रद्धांजली म्हणून वाशिम शहरातील सर्व प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने आज बंद ठेवली होती. दुपारी ३.३० वाजता शहीद अमोल गोर यांचे पार्थिव त्यांच्या सोनखास या मूळगावी पोहचल्यानंतर सर्वप्रथम घरी नेण्यात आले. त्यानंतर गावाजवळच असलेल्या शहीद अमोल यांच्या शेतात सायंकाळी ५:२० वाजता शासकीय लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

अरुणाचल प्रदेशातील कमेंग व्हॅली येथे चीन सीमेवर देशाचे रक्षण अमोल गोरे आणि त्यांचे दोन सहकारी जवान गस्तीवर असताना कमेंग व्हॅली येथे मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहत होते. यादरम्यान पाण्याचा मोठा प्रवाह त्यांच्या दिशेने आला. या प्रवाहात अमोल व त्यांचे दोन सहकारी जवान वाहून जात असतांना अमोल यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना पाण्याच्या प्रवाहातून वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अमोल यांच्या डोक्याला पाण्याच्या प्रवाहातील एक मोठा दगड लागला आणि यातच ते शहीद झाले. आपल्या दोन सहकारी जवानांना वाचविण्यात अमोल यांना यश आले. मात्र देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असताना वीरमरण पत्कारावे लागले.

माऊलीमुळे मृत्यूला चकवा; आईने बसमधून उतरवलं, बोरघाट अपघातातून आराध्य बालंबाल बचावला
शहीद अमोल गोरेंचा चार वर्षांचा मुलगा मयुर याने पित्याला मुखाग्नी दिला. अंतिम संस्कार प्रसंगी सर्वप्रथम शहीद अमोल यांचे वडील तान्हाजी गोरे, आई मंदाबाई, पत्नी वैशाली गोरे, मुले मयुर व तेजस, भाऊ हनुमान गोरे, विवाहित बहीण उमेशा भिसडे यांनी पुष्पचक्र वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम. यांनी शहीद अमोल यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिली. पॅरा युनिटचे मेजर सुबोध राठोड, मेजर अजयसिंग, भारतीय सैन्याच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चार वर्षाच्या मयुरला बघून जनमानस हळहळले

शहीद जवान अमोल गोरे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सोनखास येथे त्यांच्या घरी पोहोचताच त्यांच्या परिवारात एकच आक्रोश झाला. अमोलच्या चार वर्षांच्या चिमुकल्याच्या प्रश्नाने तर उपस्थितांची मने हेलावून गेली. शहीद जवान अमोल गोरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचा चार वर्षाचा मुलगा मयुर याला पार्थिवाजवळ नेले असता “माझ्या बाबांना काय झाले? त्यांच्या डोक्याला असे का बांधले? ते उठत का नाहीत. मला का बोलत नाहीत? त्यांच्या कपाळाला कुंकू का लावले?” असे प्रश्न विचारत होता. हे ऐकून सर्वांच्या डोळ्यात अश्रूधारा वाहू लागल्या. छोट्याशा मयुरला अनेक प्रश्नांची उत्तरे तर मिळालीच नाहीत, पण आजूबाजूचा आक्रोश आणि हंबरडा ऐकून अखेर छोटासा मयुरही रडायला लागला. या चिमुकल्याच्या हातांनीच शहीद अमोल गोरे यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला.

जेवून घ्या रे, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा फोन; लेकरं शोधत राहिली, माऊली परतलीच नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed