• Sat. Sep 21st, 2024
सूर्यदेव कोपला! कागलमध्ये एकाच दिवशी एकाच गावात उष्माघाताचे तीन बळी

कोल्हापूर :कोल्हापूरसह राज्यात उष्णतेची लाट आली असून नागरिक हैराण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात उष्माघाताने तब्बल १३ जणांचा मृत्यू झालेला असताना आता कोल्हापुरातील कागल तालुक्यातील आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे नागरिकांनी गरज पडली तरच बाहेर पडावे असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.कोल्हापुरातील कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द येथे राहणाऱ्या तिघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी एकाच दिवसात दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

सोमवारी सकाळी सीताबाई शिवाजी पाटील (वय ५४ वर्ष) या नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेल्या होत्या. सकाळपासूनच शरीराला उन्हाचे चटके लागत असताना देखील त्या शेतात काम करत होत्या. दरम्यान दुपारच्या सुमारास उष्णता वाढल्याने त्या घरी आल्या. तहान लागल्याने त्या पाणी प्यायल्या. नंतर क्षणार्धातच त्यांना चक्कर आली आणि त्या कोसळल्या. अशातच त्यांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या प्रकाराने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मागे एक मुलगा दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.

तर दुसरी घटना सातापा भाऊ पाटील (वय ५२ वर्ष) यांच्यासोबत घडली आहे. त्यांना वाढत असलेल्या उन्हाचा दोन दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने अस्वस्थ वाटू लागले. त्यांना कोल्हापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांचेही सोमवारी निधन झाले.

महाराष्ट्र भूषण सोहळा: सोलापूरच्या महिलेचा उष्माघाताने बळी, लेकीचा मृतदेह पाहून आईचा हंबरडा
तिसरी घटना ही याच गावातील जनाबाई विठ्ठल कांबळे (वय ८० वर्ष) यांच्यासोबत घडली. वय झाल्याने त्यांना उष्णतेचा जास्त त्रास होऊ लागला. अशातच त्यांना धाप लागू लागल्याने चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचाही सोमवारी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

दिवसेंदिवस राज्यात तापमान वाढत असून उष्णतेची लाट पसरत आहे. यामुळे नागरिकांनी महत्त्वाचं काम असल्यासच घराबाहेर पडावे. बाहेर जायचे असल्यास छत्री, टोपी, गॉगल, पाण्याची बाटली घेऊनच बाहेर पडावे आणि शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त ठेवावे असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

जेवून घ्या रे, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा फोन; लेकरं शोधत राहिली, माऊली परतलीच नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed