• Sat. Sep 21st, 2024

मोठा दिलासा! मे महिन्यात करोना रुग्णांची संख्या घटणार, तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

मोठा दिलासा! मे महिन्यात करोना रुग्णांची संख्या घटणार, तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

म. टा. प्रतिनिधी, पुणे:करोना विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एक्सबीबी.१.१६’ या विषाणूचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढत आहे. राज्यात १३ एप्रिलपर्यंत ‘एक्सबीबी’ विषाणूच्या ६२७ रुग्णांचे निदान झाले आहे. मात्र, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.राज्यात आतापर्यंत ‘एक्सबीबी.१.१६’ विषाणूच्या ६२७ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ३५१ रुग्णांची नोंद पुणे जिल्ह्यात झाली आहे. मात्र, बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. पुणे जिल्ह्यात सध्या ३५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ‘मॉकड्रिल’ घेण्यात आले आहे. ऑक्सिजन खाटा, विलगीकरण खाटा, ऑक्सिजन सिलिंडर, औषधांचा साठा याची माहिती ‘मॉकड्रिल’मध्ये घेण्यात आली आहे.

लसीकरण आवश्यक

सरकारने तयारीसाठी ‘मॉकड्रिल’ घेतले. मात्र, लशींच्या अभावी राज्यात बहुतांश ठिकाणी करोना प्रतिबंधक लसीकरण बंद आहे. करोनावर नियंत्रण मिळण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असल्याने केंद्र सरकारने लशींचा पुरवठा करणे आवश्यक आहे; तसेच सध्या ज्या रुग्णांचा करोनामुळे मृत्यू होत आहे, त्या मृत्यूंचे परीक्षण करणेदेखील आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संसर्ग वाढण्याचे कारण काय?

– वातावरणातील बदल.

– सकाळ, दुपार आणि रात्रीच्या तपमानात होत असलेली तफावत.

– फ्लूचे रुग्ण वाढल्याने चाचण्यांची संख्या वाढली.

– विषाणूचा संसर्ग होण्यासाठी पोषक असलेली तपमान.

(बार चार्ट करता येईल)

जिल्ह्यानिहाय करोनारुग्ण

(एक्सबीबी.१.१६ उपप्रकार)

(– ते १३ एप्रिलपर्यंत)

पुणे : ३५१

नागपूर : ८६

कोल्हापूर : ३५

ठाणे : २९

छत्रपती संभाजीनगर : २४

मुंबई : २३

बुलढाणा : २०

सोलापूर : १९

नगर : १७

अमरावती : ११

चंद्रपूर : ४

गडचिरोली : ४

अकोला : ३

रायगड : १

करोना हा आता स्थानिक स्वरूपाचा आजार (एंडेमिक) झाला आहे. त्यामुळे काही कालावधीनंतर रुग्णसंख्या कमी जास्त होत राहणार आहे. सध्या एक्सबीबी.१.१६ विषाणूचा संसर्ग होत आहे. येणाऱ्या काही दिवसांत या विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढेल. मात्र, मे महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्येचा आलेख खाली येईल, अंदाज आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सध्याची रुग्णसंख्या कमी आहे.

– डॉ. सुभाष साळंखे, सदस्य, राष्ट्रीय करोना टास्क फोर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed