या प्रकरणी तुळजापुर पोस्टेला गुन्हा रजिस्टर नंबर १०६/२३ कलम ४६१, ३८० भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे हे दुकान तुळजापूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. शिवाय येथे स्थानिक व भाविकांची नेहमी वर्दळ असते. गुन्हेगारांनी हा गुन्हा करून पोलिसांना आव्हान दिले होते. पोलिसांनी हे आव्हान स्विकारत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे.
गुन्हेगार गुन्हा करण्यापूर्वी जिथे गुन्हा करायचा आहे, तेथील रेकी करतो. तशीच रेकी या गुन्हेगारांनी १९ फेब्रुवारी रोजी केली होती. आणि येथेच एक चुक गुन्हेगाराकडून घडली. रेकी करताना वापरलेला बूट आणि गुन्हा करताना वापरलेला बूट एकच होता. शिवाय अंगावरील कपडे तेच होते. रेकी आणि गुन्हयाचे दृश्य कॅमेऱ्यात सापडल्यामुळे पोलिसांचे काम सोपे झाले.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, पोलीस निरीक्षक आजीनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यांनी या गुन्हयातील आरोपी अकबर खान हाबिब खान (राहणार- मालेगांव, जिल्हा- नाशिक), आबु शाहिद असरु आली शेख (राहणर- शिवाजीनगर, मुंबई) यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली.
तर या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. नाशिकमधील मालेगाव येथील आरेापींच्या घराची घर झडती घेऊन गुन्हयातील चोरीस गेलेल्या माला पैकी सॅमसंग कंपनीचे २८ मोबाईल, विवो कंपनीचे ३७ मोबाइल, वन प्लस कंपनीचा १ मोबाइल, ओप्पो कंपनीचे १८ मोबाइल, रेडमी कंपनीचे ९ मोबाइल, ॲपल कंपनीचे १० मोबाइल, नोकिया कंपनीचा १ मोबाईल असे विविध कंपनीचे एकूण १०४ मोबाइल जप्त करण्यात आले. यांची एकूण किंमत २३,०६,३९६ रुपयांचा माल जप्त केला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे हे करीत आहेत.