• Sat. Sep 21st, 2024

रेल्वेचा आज 'रविवार'! आंबेडकर जयंतीनिमित्त रविवार वेळापत्रकानुसार धावणार गाड्या, शेकडो फेऱ्या रद्द

रेल्वेचा आज 'रविवार'! आंबेडकर जयंतीनिमित्त रविवार वेळापत्रकानुसार धावणार गाड्या, शेकडो फेऱ्या रद्द

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘गुड फ्रायडे’नंतर लगेचच आज, शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सुट्टीचा मुहूर्त साधून मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे आजही शेकडो फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागणार आहे. यामुळे रेल्वे पुन्हा प्रवाशांचा संताप ओढवून घेणार आहे.मुंबई शहरातील अनेक कंपन्यांमध्ये सकाळ, दुपार आणि रात्र या तिन्ही प्रहरांमध्ये कर्मचारी काम करतात. सरकारी कार्यालये आणि बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी भर पगारी सुट्टी मिळते. मात्र अनेक खासगी कंपन्यांमध्ये राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात येऊन काम करावेच लागते. या पार्श्वभूमीवर आजच्या आंबेडकर जयंतीदिनी रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालवण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचे हाल होणार आहेत.

गँगमन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना रुळ-स्लीपर, सिग्नल, ओव्हरहेड वायर, रुळांची जोडणी आणि अन्य तांत्रिक बाबींची पाहणी करता यावी, यासाठी रविवारचे वेळापत्रक आखले जाते. ही कामे सुरळीत करता यावीत, असा प्रयत्न असतो, असे रेल्वेचे म्हणणे आहे. तर, महिला, पुरुष, दिव्यांग प्रवाशांच्या संख्येनुसारच महिलांसाठी राखीव डब्यांचे नियोजन करण्यात आले आहे, असा रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा आहे.

प्रवासी म्हणतात…

रविवार वेळापत्रकाचा विशेषत: महिला प्रवाशांना रोजच्या तुलनेत अधिक त्रास होतो. ‘रविवार वेळापत्रकाच्या दिवशी तिकीट तपासनीसांची संख्या कमी असल्याने प्रथम श्रेणीच्या महिला डब्यात घुसखोरी होते. त्याचा त्रास हजारो रुपये मोजून प्रथम श्रेणीचा पास काढणाऱ्यांना होतो. यामुळे महिला विशेष गाड्यांची संख्या वाढवण्यात यावी व रविवार व्यतिरिक्तच्या सुट्टीच्या दिवशी हे वेळापत्रक लागू करू नये’, अशी मागणी महिला प्रवासी नलिनी देशमुख यांनी केली.

सुंदर हिल स्टेशन

‘राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही आम्हाला कार्यालयात जावेच लागते. मात्र रविवार वेळापत्रकामुळे लोकलला मोठी गर्दी असते. याच दिवसांत नियमित प्रवासाची सवय नसलेल्या प्रवाशांची संख्या मोठी असते. लोकल फेऱ्या अपुऱ्या असल्याने सर्वच डब्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. मध्य आणि पश्चिम रेल्वेने सर्वसामान्यांच्या या त्रासाची दखल घेणे गरजेचे आहे’, अशी प्रतिक्रिया प्रवासी नरेश माने यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed