पंढरपुरात दररोज पहाटे चार ते पाच या वेळेत विठ्ठल आणि रूक्मिणी मातेची नित्यपूजा करण्यात येते. यामध्ये विठ्ठलाच्या नित्येपूजेसाठी २५ हजार तर रुक्मिणीच्या नित्येपूजेसाठी ११ हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. हे शुल्क भरल्यानंतर ठरलेल्या दिवशी संबंधित भाविक आणि त्याच्यासोबतच्या दहाबारा लोकांना नित्यपूजेसाठी मंदिरात प्रवेश देण्यात येतो. विठुरायावर असलेल्या श्रद्धेपोटी ही नित्यपूजा करायला मिळावी, अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते. करोनाच्या काळात विठ्ठल मंदिरातील नित्यपूजा बंद करण्यात आली होती. त्यामुळे नित्यपूजेसाठी बुकिंग असलेल्या भाविकांची संधी हुकली होती. मात्र, जानेवारी महिन्यापासून विठ्ठल-रखुमाईच्या नित्यपूजेला सुरुवात झाली असून रोज पाच भाविक कुटुंबांना मंदिरात प्रवेश दिला जातो.
करोनाच्या पार्श्वभूमवीर पंढरपूरच्या मंदिरात सतर्कता
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोना रुग्णाांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्कचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंढरपूर आणि आजुबाजूच्या परिसरातही करोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिरातील स्वच्छतेवर भर दिला जात आहे. दिवसातून तीन ते चारवेळा देवाचा गाभारा आणि मंदिरातील दोन्ही सभामंडपांची स्वच्छता केली जात आहे.