• Mon. Nov 25th, 2024

    कल्याण-डोंबिवलीत धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना ठोकल्या बेड्या

    कल्याण-डोंबिवलीत धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना ठोकल्या बेड्या

    डोंबिवली, ठाणे : डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागात ओला चालक, छोट्या व्यावसायिकांना चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या दरोडेखोर टोळीचा डोंबिवलीमधील मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या टोळीतील तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. चंद्रकांत उर्फ मोठा चंद्या जमादार, शिवा तूसंबल, सत्यप्रकाश कनोजिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. यामधील मोठा चंद्या हा टोळीच्या म्होरक्या असून तो तडीपार होता. विशेष म्हणजे चंद्या रिक्षा चालक असून तो रिक्षाचा वापर लुटमार करण्यासाठी करायचा. तडीपार असताना पोलिसांना चकवा देत तो आणि त्याचे साथीदार लुटपाट करत होते.ओला बुक करून पाच जणांच्या या टोळीने ओला चालकाला मारहाण करत त्याच्याजवळील मोबाइल व रोकड लुटल्याची घटना डोंबिवलीमध्ये घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस पथकाने या आरोपींचा शोध सुरू केला. या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करत पोलिसांनी या आरोपींचा ठावठिकाणा मिळवला. आणि डोंबिवलीमध्ये विविध ठिकाणी सापळा रचत पोलिसांनी या पाच जणांच्या टोळीचा म्होरक्या चंद्रकांत उर्फ मोठा चंद्या जमादार याच्यासह शिवा तूसंबल, सत्यप्रकाश कनोजिया या तिघांना अटक केली. तर या टोळीच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतलं. आणखी एका अल्पवयीन साथीदाराच्या पोलीस शोध घेत आहेत.

    टोळीवर विविध ठिकाणी गुन्हे

    या टोळी विरोधात डोंबिवली, टिळकनगर खडकपाडा, हीललाईन पोलीस ठाण्यात खून, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, चोरी, घरफोडी अशा प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. चंद्रकांत उर्फ मोठा चंद्या जमादार याच्यासह शिवा तूसंबल, सत्यप्रकाश कनोजिया व त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार गुन्हेगारी पार्शवभूमीचे आहेत. या टोळीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली.
    भयंकर! डोंबिवलीत हातात कोयते घेऊन रस्त्यावर टोळीचा बेभान नाच, धुडगूस घालत महिलेला धमकावलं
    तडीपार असतानाही करत होता लुटमार

    चंद्रकांत उर्फ मोठा चंद्या जमादार याच्याविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तडीपार असताना तो आपल्या साथीदारांसह डोंबिवली आणि कल्याणच्या ग्रामीण भागात लुटमार करत होते. त्याच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम, ११ मोबाइल फोन, लॅपटॉप, रिक्षा असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीविरोधात डोंबिवली, टिळकनगर खडकपाडा, हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, दरोडा दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

    फेरीवाल्यांमुळे राजू पाटील आक्रमक, मनसैनिक रस्त्यावर उतरले

    कसे करायचे लुटमार?

    या टोळीने कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली परिसरात धुमाकूळ घातला होता. ही पाच जणांची टोळी ओला कार बुक करायची आणि यामधील तीन जण गाडीत बसायचे तर उर्वरित दोन जण रिक्षाने ओला गाडीचा पाठलाग करत निर्मनुष्य जागेत गाडी थांबवायचे. आणि कार चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटायचे. इतकेच नव्हे रस्त्याने एखाद्या वाहनाला कट मारत मुद्दाम वाद घालत मारहाण करत गाडी चालकाला लुटायचे. तर कधी लुटण्याच्या उद्देशाने प्रवाशाला रिक्षात बसवून लुबाडत होते. या भागातील हातगाड्या लावणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना चाकूचा दाखवत त्यांच्या जवळील मोबाइल, रोकड हिसकावून निघून जायचे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed