• Sat. Sep 21st, 2024

मुंबईत निर्जनस्थळी जोडप्याला गाठलं, मुलीला पाठवून मुलाला बेदम मारहाण, लुटून नाल्यात फेकलं

मुंबईत निर्जनस्थळी जोडप्याला गाठलं, मुलीला पाठवून मुलाला बेदम मारहाण, लुटून नाल्यात फेकलं

मुंबई: चार तरुणांच्या टोळीने सोमवारी नाहूर येथे एका निर्जनस्थळी बसलेल्या जोडप्याला घेरलं. त्यानंतर महिलेला तेथून जाण्यास भाग पाडले. पण, पुरुषाला बेदम मारहाण करून त्याचे कपडे फाडले, त्याच्याकडील ५ हजार २०० रुपयांची रोकड लुटून त्याला नाल्यात फेकून दिले.पीडित दीपक शिंदे (वय – २५) कसाबसा नाल्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झाला आणि त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यानंतर तात्काळ पोलिसांचं पथक तिथे दाखल झालं आणि त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याने आपली तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून कांजूरमार्ग पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कांजूरमार्ग पोलिसांनी दुर्वेश केणी (वय २२), पवन बैदर (वय २०), ओंकार बिंगरदिवे उर्फ ततला (वय २४) आणि हेमंत वैती (वय २४) या चार आरोपींना भांडुप गावातून अटक केली आहे.

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, शिवसेना महिला कार्यकर्त्यांवर आरोप

शिंदे यांनी पोलिसांना सांगितले की ३ मार्च रोजी तो आणि त्याची मैत्रीण ज्याच्याशी त्याची इंस्टाग्रामवर मैत्री झाली होती, ते नाहूर रेल्वे स्थानकाजवळ भेटले आणि काही क्षण खासगीत घालवण्यासाठी त्यांनी एका निर्जन ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. दुपारी दोनच्या सुमारास ते एका झाडाखाली बसले असताना अचानक चार तरुण तिथे आले आणि त्यांनी त्या जोडप्याला इथे काय करत आहात, अशी विचारणा केली. त्यांचे ओळखपत्र पाहून त्यांची नावं वगैरे जाणून घेतल्यानंतर त्यांनी महिलेला तेथून निघून जाण्यास सांगितलं. मात्र, त्या चौघांनी शिंदे यांना पकडून बेदम मारहाण केली. आरोपींनी या संपूर्ण घटनेची व्हिडिओ रेकॉर्डिंगही केली होती.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, त्या चौघांनी शिंदे यांच्या खिशातून ५,२०० रुपये रोख काढून घेतले. त्यांनी त्याचा मोबाईल फोन घेतला नाही. पण, त्यांनी या दोघांचेही मोबाईल नंबर घेतले आणि पोलिसात तक्रार केल्यास त्यांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली.

शिंदे यांना पोहतो येत नव्हतं, म्हणून त्यांनी आरोपींना विनंती केली की मला नाल्यात टाकू नका. पण तरीही त्यांनी शिंदे यांना नाल्यात फेकून दिलं. शिंदे यांनी आरोपींच्या मोटारसायकलचे क्रमांक नोंदवले होते, ज्याच्या आधारे पोलिसांनी त्यांचा भांडुप गावातून शोध घेतला, असं पोलिसांनी सांगितलं. या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का किंवा त्यांनी यापूर्वी अशाच प्रकारे अन्य कोणाला लुटले आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed