भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण (ता. इंदापूर) येथे दिनांक १६ मार्च २०२३ रोजी दुपारी पावणेएकच्या सुमारास प्रभू मेडीकल येथील हिताची एटीएम सेंटरमध्ये हेमंत बापुराव गोफणे, (रा. वाटलुज, ता. दौंड, जि. पुणे) हे पैसे काढण्यासाठी गेले असताना त्यावेळी तेथील अनोळखी इसमाने त्यांना मी पैसे काढून देतो असे सांगून त्यांच्या एटीएमचा पासवर्ड माहिती करून घेतला. नंतर त्याने हातचलाखी करून त्यांच्या जवळील बनावट एटीएम कार्ड गोफणे यांना देवून त्यांच्या एटीएम कार्डच्या सहाय्याने अनेक ठिकाणाहून फिर्यादीचे संमतीशिवाय त्यांच्या एच.डी.एफ.सी बँकेच्या एटीएममधून वेळोवेळी १ लाख ३० हजार ३०० रुपये रोख रक्कम काढली. याबाबत फिर्यादीच्या तक्रारीवरून भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकाला तपासकामी सूचना केल्या व त्यानुसार त्यांना मार्गदर्शन केले. गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचे तांत्रिक विश्लेषण व एटीएम सेंटरमधील कॅमेरे, टोलनाक्याचे सी.सी.टी.व्ही फुटेजच्या मदतीने आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा शोध घेऊन त्याद्वारे अधिक माहिती प्राप्त केली आणि आरोपींची ओळख पटवली. या आरोपींचा मुंबई, ठाणे या भागात शोध घेऊन त्यांचा सिनेस्टाईलने पाठलाग करत जेरबंद केले. त्यांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
या आरोपींकडून भिगवणमधील गुन्ह्यातील फिर्यादीचे एटीएम व अपहृत केलेली सर्व रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वॅगन कार (नं. एम. एच. ०३ बी.सी. ६३८६) व विविध बँकांचे एकूण ५१ एटीएम कार्ड असा एकूण ५ लाख १० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.