• Sat. Sep 21st, 2024
साताऱ्यात उद्रेक, विदर्भातही कोरोनाने डोकं वर काढलं, नागरिकांची धाकधूक वाढली

अकोला : अकोला जिल्ह्यात नियंत्रणात असलेली कोरोनाची स्थिती मागील काही दिवसांत पुन्हा धोकादायक ठरत असल्याचं चित्र आहे. कारण अकोला जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कासवगतीने वाढीस लागली असून, आज अकोल्यात दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) ६४ जणांचा अहवाल प्राप्त झालाय. त्यामध्ये २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आलेत. दरम्यान कोरोनानं अकोलेकरांची पुन्हा चिंता वाढविली असून सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोविडचे ३८ सक्रिय रुग्ण आहेत. सध्या वातावरणातील बदलामुळे व्हायरलच्या तापीने डोकेदुखी वाढली आहे. घरोघरी सर्दी, खोकला अन् तापीचे रुग्ण दिसून येत आहे. यातील बहुतांश रुग्णांचा आजार तीन दिवसांत बरा होत आहे. मात्र काही रुग्णांचा ताप आठवडाभर, तर खोकला दोन आठवड्यांच्या वर जात असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात कोरोनाचाही प्रादुर्भाव वाढत आहे.

आज मंगळवारी २० जणांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. १२ पुरुष आणि आठ महिलांचा समावेश असून बाळापूर तालुक्यातील दोन, मुर्तिजापूर तालुक्यातील ११, अकोला ग्रामीण येथील तीन व अकोला महानगपालिका क्षेत्रातील चार रुग्ण कोरोनाबाधित मिळाले आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे. दरम्यान पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सहा रुग्ण रुग्णालयात दाखल असून उर्वरीत ३२ जणांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.

अकोल्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असतानाच ‘एच३एन२’च्या संदिग्ध रुग्णांचीही संख्या वाढू लागली आहे. शासकीय रुग्णालयांसबोतच खासगी रुग्णालयातील संदिग्ध रुग्णांचे नमुने तपासणीसाठी जीएमसीच्या व्हीआरडीएल लॅबमध्ये पाठविले जात आहेत. मात्र, या ठिकाणी ‘एच३एन२’ च्या चाचणीसाठी आवश्यक टेस्टिंग कीट मर्यादित आहेत.

संभाव्य धोका लक्षात घेता या कीट अपुऱ्या ठरू शकतात. त्यामुळे चार ते पाच रुग्णांचे नमुने आल्यावरच या कीटचा वापर केल्या जात असल्याची माहिती आहे. दरम्यान सद्यस्थितीत जिल्ह्यात ‘एच३एन२’ चा एकही रुग्ण नाही आहे. मात्र, अकोल्यात ‘एच३एन२’मुळे (H3N2) एका सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. हा मयत मुलगा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed