सोशल मीडियाने जग अधिक जवळ आलंय. सोशल मीडियाद्वारे आपण अनेक लोकांशी जोडलेलो असतो. अगदी अनोळखी लोकांच्या आयुष्यातही काय सुरु आहे, याचा अंदाज आपल्याला सोशल मीडियावरुन येतो. सोशल मीडिया हे जेवढं चांगलं तेवढंच ते वाईटही आहे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावरुन वाढलेली ट्रोलिंग आणि त्याचा संबंधितांना होणारा त्रास… सिराजनेही मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना केलाय. हेच दु:ख सांगताना त्याने हात जोडून क्रीडा रसिकांना सभ्यतेचं आवाहन केलंय.
मोहम्मद सिराज काय म्हणाला?
एखाद्याबद्दल वाईट शब्द लिहिणे सोपे आहे, वाईट बोलणे सोपे आहे. परंतु त्याच्या संघर्षाबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं. एखादी व्यक्ती विनाकारण एखाद्याला ट्रोल करत असते. मी तर खूप वेळा ट्रोलिंगचा सामना केलाय. मला एकदा म्हणतात, काय खेळतोस तू… तू भारताचं भविष्य आहे आणि दुसर्या दिवशी तेच लोक म्हणतात, तुझ्या हातून काहीच होणार नाही, तू ऑटो रिक्षाच चालव. लोक क्षणात एवढे कसे बदलू शकतात…?
ज्यावेळी आम्ही चांगली कामगिरी करतो, त्यावेळी लोक आमची प्रशंसा करतात. ज्यावेळी मला रिटेन केलं गेलं त्यावेळी आतापर्यंतचं बेस्ट रिटेंशन असल्याचं अनेकांनी म्हटलं. पण त्यानंतर काहीच दिवसांनी मला ट्रोल करायला सुरुवात केली. मला संघात का ठेवलंय? अशी विचारणा सुरु झाली. याचं संघात काय काम आहे? इथपर्यंत लोकांची मजल गेली. मी क्रिकेट खेळण्यासाठी लायक नाही, हे ही लोकांनी सांगून झालं… मला लोकांना सांगायचंय की एखाद्याला शिव्या देणं सोपं असतं पण त्याचा संघर्ष खूप मोठा असतो. तो कृपया समजून घ्या… असं आवाहन करतानाच ट्रोलिंग करु नका हे सांगताना सिराजने लोकांना हात जोडले.