म. टा. वृत्तसेवा, कल्याण : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्याबरोबरच कल्याण-डोंबिवलीतील नोकरदारांना कमीत कमी वेळेत ठाण्यात पोहोचता यावे यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या डोंबिवली-माणकोली उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून मे अखेरीस या पुलाचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या पुलामुळे डोंबिवलीतून केवळ २० मिनिटांत ठाणे गाठणे शक्य होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.शहरात पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी २०१३ मध्ये डोंबिवली, मोठागाव ते भिंवडीतील माणकोली असा उल्हास नदीवर १२२५ मीटर लांब व २७.५ मीटर रुंद पूल प्रस्तावित करण्यात आला होता. या पुलासाठी भूसंपादनासह इतर अडचणी उद्भवल्याने या पुलाचे भूमिपूजन होण्यासाठी १८ सप्टेबर २०१६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. नंतर या पुलाचे काम सुरू झाले असले तरी भूसंपादनाची प्रक्रिया अडथळा ठरली होती. डोंबिवली दिशेकडून पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी भिवंडीकडून जागा मिळत नसल्याने काम जवळपास वर्षभर रखडले होते यामुळेच एकाच दिवशी भूमिपूजन झालेल्या दोन पुलांपैकी दुर्गाडी पुलाचे लोकार्पण फेब्रुवारी, २२ मध्ये करण्यात आले असले तरी माणकोली पुलाची प्रतीक्षा मात्र कायम आहे.
डोंबिवली पश्चिमेकडून बाहेर पडण्यासाठी सद्यस्थितीत वाहनचालकांना डोंबिवली पूर्वेकडे येत कल्याण शिळमार्गे कल्याण किंवा मुंब्रा बायपास मार्गाने ये जा करावी लागत आहे. संपूर्ण शहराला वळसा घालण्यात वाहनचालकांना दीड ते दोन तासांचा वेळ लागत असल्याने वेळ आणि इंधनाची नासाडी होत आहे. यामुळेच पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करत वाहनचालकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. राजनोलीपासून सहा किमी आधी ठाण्याच्या दिशेने माणकोलीजवळ हा पूल उभारला जात आहे. या पुलामुळे ठाणे-डोंबिवली हे अंतर अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे.ठणे ते भिंवडी रस्त्याचे रुंदीकरणदेखील वेगाने सुरू असल्याने वाहनचालकांना डोंबिवली ते ठाणे वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करणे शक्य आहे. एमएमआरडीएकडून कमीत कमी कालावधीत या पुलाचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून राजकीय नेत्यांसाठीदेखील हा पूल महत्त्वाचा असल्याने या पुलाच्या लोकार्पणाकडे नजरा लागल्या आहेत.
वडील वारले, आईनं शाळेत भात शिजवून दोन्ही पोरांना वाढवलं; एक लेक शिक्षक तर दुसऱ्याला १ कोटी ७० लाखांची फेलोशिप