• Sat. Sep 21st, 2024

नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिंसा दौडचा समारोप

ByMH LIVE NEWS

Apr 2, 2023
नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिंसा दौडचा समारोप

नागपूर, दि.2 – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सेंट उर्सूला हायस्कूल येथे आयआयएफएल जितो अहिंसा दौडचा समारोप करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दौड स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यावेळी उपस्थित होते.

जगातील 23 देशांमध्ये अहिंसेची शपथ घेत या अहिंसा दौडचे आयोजन करण्यात आले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या अनोख्या दौडची नोंद करण्यात आली. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या महिला शाखेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौडच्या समारोपप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. भगवान महावीर यांच्या अहिंसेच्या मार्गाचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री म्हणाले की, भगवान महावीर यांनी अहिंसेचा मंत्र समस्त मानवजातीला दिला आहे. सर्वांना जगण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी आपल्या तत्वज्ञानातून सांगितले. भगवान महावीर यांचे अहिंसेचे तत्वज्ञान आज जगाला वाचवू शकते. अहिंसा दौडच्या माध्यमातून अहिंसेची शपथ घेत आज आपण शांततापूर्ण मार्गावर चालण्याची शपथ घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

भगवान महावीर यांच्या तत्वज्ञानाबरोबरच जैन समाजाचा  गौरवपूर्ण उल्लेख करीत उपमुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या प्रगतीमध्ये जैन समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजाचे गोसेवा ते मातृसेवेपर्यंतचे कार्य प्रशंसनीय  आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केल्यास जैन समाजाच्या योगदानाशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. अनेक सामाजिक उपक्रम, कार्य हे जैन समाजाच्या माध्यमातून पूर्णत्वास आले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed