भाजप आणि शिंदे गटाने सावरकर यात्रा जरुर काढावी. पण त्यापूर्वी शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी वीर सावरकरांचं साहित्य वाचलं पाहिजे, त्याची पारायणं केली पाहिजेत. वीर सावरकर यांनी या देशाला एक दिशा दिली आहे, वैज्ञानिक दृष्टीकोन दिला आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन भाजप आणि मिंधे गट पाळणार असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याचा महत्त्वाचा संदर्भ दिला, विज्ञानवाद हा त्यांच्या विचारसरणीचा पाया होता, असे संजय राऊत यांनी सांगितले. भाजपचे नेते गायीला गोमाता म्हणतात, ती पूजनीय असल्याचे सांगतात. पण सावरकर म्हणाले होते की, गाय हा केवळ एक उपयुक्त पशू आहे. गाय दूध देत नसेल तर गोमांस खायला हरकत नाही. वीर सावरकरांचा हा विचार भाजपला मान्य आहे का? सावरकरांना शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नव्हते, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
…मग एकनाथ शिंदे दाढी काढून फिरणार आहेत का?
वीर सावरकर यांना दाढी वाढवलेली आवडत नसे. मग सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा काढणारे मुख्यमंत्री शिंदे आपली दाढी कापणार आहेत का? दाढी वाढवणं आपलं काम नाही, व्यवस्थित राहायचं, असे सावरकर म्हणायचे. मग आता वीर सावरकरांच्या विचारांचे पालन करायचे झाल्यास एकनाथ शिंदे गुळगुळीत दाढी करुन फिरणार आहेत का, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला.
भाजप-शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रेला सुरुवात
भाजप आणि शिंदे गटाकडून ठरल्याप्रमाणे रविवारी सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे अशा विविध भागांमध्ये स्थानिक नेत्यांकडून या यात्रा काढण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील सावरकर गौरव यात्रेत सहभागी झाले होते.