• Mon. Nov 25th, 2024

    शेतीसह नर्सरी विकसित करून साधली आर्थिक उन्नती

    ByMH LIVE NEWS

    Apr 1, 2023
    शेतीसह नर्सरी विकसित करून साधली आर्थिक उन्नती

    प्रचलित शेतीपद्धतीला फाटा देत नवनवे प्रयोग व उत्कृष्ट रोपांसाठी स्वत:ची नर्सरी तयार करून मोर्शी तालुक्यातील एका शेतकरी बांधवाने आर्थिक प्रगती साधली आहे.

    शेती विकासासाठी सूक्ष्म सिंचन, नाविन्यपूर्ण पीक, अद्ययावत तंत्रज्ञान अशी विविध प्रयोगशीलता जोपासणे आवश्यक असते. हे लक्षात घेऊन मोर्शी येथील ओमनगरमधील प्रफुल्ल गणपतराव हेलोडे यांनी आपली प्रयोगशीलता व विविध शासकीय उपक्रमांची साथ यांची सांगड घालून उत्कृष्ट शेती फुलवली आहे.

    प्रफुल्ल हेलोडे यांनी कृषी विभागाच्या क्रॉपसॅप व पाणलोट प्रकल्पात काही काळ काम केले. त्यांनी नोकरी न करता स्वत: शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे स्वत:ची शेती नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी 17 एकर शेती करार तत्वावर घेतली व या सर्व शेतीत ठिबक सिंचन यंत्रणा बसविली. शेतीत त्यांनी नाविन्यपूर्ण पीके घेतली. दोन एकरात ॲशगार्डच्या (पेठा) लागवडीचा प्रथम प्रयोग केला. त्यात एकरी 25 टन उत्पादन मिळाले. या पिकाचे उत्तम उत्पादन त्यांनी सातत्याने घेतले. नागपुरातील नामांकित खाद्यपदार्थ उद्योगाने त्यांच्याकडून नियमित या उत्पादनाची नियमित खरेदी केली. त्यामुळे हेलोडे यांना चांगले उत्पन्न मिळू लागले.

    जैविक शेतीचाही प्रयोग त्यांनी केला. तळणी येथे शेती विकत घेऊन त्यांनी सर्व शेतावर मल्चिंग केले. बांबूच्या शेडवर काकडीचे तीन महिन्याचे पीक घेऊन उत्पादन सातत्य ठेवले.  मल्चिंग पेपरचा वापर संपूर्ण शेतावर आच्छादित ठेवण्यासाठी ट्रॅक्टरचलित मशिन तयार केली.

    भाजीपाल्याची रोपे स्वत: तयार करता यावी म्हणून त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी नर्सरीला भेटी दिल्या. अभ्यास करून स्वत: रोपे तयार केली. शेतात शेडनेट व पॉलिहाऊस उभारण्यासाठी ‘आत्मा’मार्फत तळेगाव दाभाडे येथे प्रशिक्षण घेतले.

    कृषी विभागाच्या एमआयडीएच योजनेच्या माध्यमातून पॉलिहाऊस व शेडनेटची उभारणी केली. त्यात ते मिरची, काकडी, कोबी, टमाटे आदी भाजीपाला रोपे, टरबुज, खरबूज आदी रोपांची निर्मिती करत आहेत. त्यातून त्यांना चांगला नफा मिळू लागला. फुलांचेही उत्पादन त्यांनी घेतले. आपल्या नर्सरीत ते शेतकरी बांधवांना रोपांची विक्रीही करतात. पॉलिहाऊस व शेडनेटनंतर त्यांनी द्वारका हायटेक नर्सरीची उभारणी केली. त्यांची 50 लाखांवर रोपविक्री झाली. आता तर त्यांची वार्षिक उलाढाल दीड- दोन कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. ते शेतकरी बांधवांना विविध पिकांसंदर्भात मार्गदर्शनही करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कृषी विभागाने त्यांना उद्यान पंडित म्हणून गौरविले आहे.

    हर्षवर्धन पवार, जिल्हा माहिती अधिकारी,

    अमरावती

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed