मुंबई, 29 मार्च 2023 : पहिल्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या बैठकीचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते आज मुंबईत उद्घाटन झाले. जी -20 सदस्य देश, निमंत्रित देश, प्रादेशिक गट आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे सुमारे 100 प्रतिनिधी G20 TIWG उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
भारताच्या अध्यक्षतेखाली पाठपुरावा केला जात असलेल्या जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित प्राधान्यक्रमांवर आज (29 मार्च, 2023) चर्चा करण्यात आली आणि उद्याही (30 मार्च, 2023) चार तांत्रिक सत्रांमध्येही चर्चा केली जाईल. आज झालेल्या चर्चेत विकास आणि समृद्धीसाठी व्यापार आणि लवचिक जागतिक मूल्य साखळी तयार करण्याबाबत पुढील उपायांवर भर देण्यात आला. उद्या, जागतिक व्यापारात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे एकात्मीकरण करण्यासाठी व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाचे प्राधान्यक्रम आणि व्यापारासाठी कार्यक्षम लॉजिस्टिक व्यवस्था उभारण्यावर कामकाजाच्या दोन सत्रांमध्ये चर्चा केली जाईल. मसाले, तृणधान्य, चहा आणि कॉफीचा संकल्पना – आधारित आस्वाद घेण्याची व्यवस्था कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारण्यात आली आहे तसेच वस्त्रोद्योग प्रदर्शनही आयोजित केले आहे.
बैठकीला संबोधित करताना, अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी विकसनशील आणि विकसित देशांमधील वाढती दरी अधोरेखित केली, जी महामारी आणि भौगोलिक – राजकीय संकटांच्या काळात आणखी तीव्र होत गेली. कार्यक्षम आणि लवचिक जागतिक पुरवठा साखळींच्या गरजेवर भर देत जी -20 सदस्य देशांनी अन्न, खते, ऊर्जा आणि औषध निर्मिती सारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये जागतिक मूल्य साखळी वैविध्यपूर्ण करणाऱ्या उपाययोजना आखण्यात सहकार्य करावे , असे मत त्यांनी व्यक्त केले. महिलांच्या मालकीच्या एमएसएमईंवर पत मर्यादा आणि इतर विविध लिंग-आधारित अडथळ्यांमुळे वेगवेगळ्या प्रमाणात परिणाम होतो असेही त्यांनी नमूद केले. एमएसएमईवरील व्यापार खर्चाचा हा विषम भार दूर करण्यासाठी डॉ. कराड यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार समुदायाद्वारे सामूहिक कारवाईचा प्रस्ताव मांडला.
००००