दिवसाला आठ-दहा तास अखंडीत वीज मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी राहिली आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात वीजेच्या वेळापत्रकानुसार पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. ऐन हंगामातच अनेकदा वीजेचा लपंडाव सुरु असतो. अनेकदा सोसाट्याचा वारा सुटतो. वीजेच्या तारा, खांबांचे नुकसान होते. परिणामी वीजपुरवठा खंडीत होतो आणि शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. तसेच त्यातल्या त्यात रात्री वीजपुरवठा दिवसाच्या तुलनेत अखंडित राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री पाणी द्यावे लागते, अशा वेळी जंगली डुकरे, कोल्हे, लांडगे, अस्वल आदी जंगली श्वापदांनी त्यांच्यावर जीवघेणे हल्ले केल्याच्या घटना घडल्याचे आपण पाहिले, वाचले आहे. जंगलाशेजारील गावांमध्ये तर वाघांच्या शिकारीस बळी पडले आहेत. असे असले तरीही शेतकऱ्यांसमोर पर्याय नव्हता. पिके वाचवणे हे सर्वात मोठे आव्हान असायचे. पाण्याविना पिके करपून जात असताना त्या शेतकऱ्याची, त्याच्या मुला-बाळांची स्वप्न करपून जात असत. त्यामुळेच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी ही, त्यांची मागणी होती.
आता राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप ही योजना आणली असून, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरात सौरकृषि वाहिनीचा लाभ घेता येतो आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा अखंड विज मिळत असल्यामुळे पिकांना मुबलक पाणी मिळत आहे. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा विजेची हमी मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत असून, आर्थिक स्तर उंचावला जात आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गंत शेतकऱ्यांना अनुदानही मिळत आहे. परभणी जिल्ह्यातील २७५ गावे या योजनेत समाविष्ट करण्यात आली असून, अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याचे चित्र आहे. अशाच एका युवा शेतकऱ्याचा सौर कृषि पंपाच्या आधारे आर्थिक स्तर ऊंचावला आहे.
परभणी तालुक्यातील वाडी दमई येथील माणिक प्रकाश वाटोडे या युवा शेतकऱ्याला शेतात विजेअभावी सिंचन करता येत नव्हते. पारंपरिक वीज वापरासाठी लागणारे विद्युत खांब आणि त्याला येणारा खर्च पाहता हे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. कुपनलिकेवर डिझेल इंजिन बसवून पिकांना पाणी देणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. या शेतकऱ्याला मुख्यमंत्री सौरकृषि पंपाची माहिती मिळाली व त्याने मुख्यमंत्री सौर कृषिपंप मिळावा, यासाठी ऑनलाईन अर्ज केला. आता हा युवा शेतकरी त्याच्या शेतात सौर कृषिपंपाच्या सहाय्याने वेगवेगळी पिके घेत असून, त्याचा आर्थिक स्तर कमालीचा सुधारला आहे. शिवाय रात्री उशिरापर्यंत शेतात थांबण्याची त्याला आवश्यकताही पडत नाही.
दिवसा शेतीपंपास विजेची उपलब्धता झाली असून, दिवसा विनाव्यत्यय वीज पुरवठा मिळत आहे. शिवाय कोणत्याही प्रकारचे वीज बिल भरण्याची आवश्यकता राहिली नसून, वीज बिलापासून मुक्तता मिळाल्याचे माणिक वाटोडे सांगतात. शिवाय माझ्या शेतात सिंचन सुविधेसाठी डिझेल पंपाशिवाय पर्याय नव्हता. त्यापेक्षा सौर कृषिपंपामुळे डिझेलच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च असून, शिवाय हे पर्यावरणपूरक आहे. सौर कृषिपंप घेण्यासाठी त्याला केवळ पाच टक्के शुल्क भरावे लागले असून, या योजनेवर असलेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याची भावना श्री. वाटोडे व्यक्त करतात.
माणिक वाटोडे या शेतकऱ्याने यंदा त्याच्या शेतात कापसाचे पिक घेतले असून, सिंचनाअभावी त्याला पिकावर बियाणे, लागवड, मजुरी आणि किटकनाशके यांच्यावर केलेला खर्चही बरेचदा भरून निघणे कठीण होत असे. आता मात्र, सौर कृषिपंपामुळे शाश्वत सिंचनाची सोय झाली आहे. त्यामुळे तो उन्हाळ्यातही पिकांना पाणी देत आहे. एरव्ही जेमतेम उत्पन्न व्हायचे. यंदा मात्र सौर कृषिपंपामुळे दिवसा अखंड विज मिळाली आहे. यावर्षी दोन एकरामध्ये आतापर्यंत २० क्विंटल कापूस झाला असून, अजून सात क्विंटल कापूस होण्याचा अंदाज त्याने व्यक्त केला आहे. शिवाय सौर कृषिपंपामुळे दिवसा विज मिळाल्यामुळे त्याने तुषार सिंचनातून जवळपास सात क्विंटल हरभरा पिक घेतले आहे. सौरकृषि पंपामुळे जनावरांना लागणारा चाराही उपलब्ध झाला असून, तो ही प्रश्न मिटला आहे. सौर कृषिपंपामुळे आता मला स्वत:च्या शेतात बारमाही पिक घेऊन आर्थिक उन्नती साधता येत असल्याचे माणिक वाटोडे हा युवा शेतकरी सांगतो.
– प्रभाकर बारहाते, माहिती अधिकारी
जिल्हा माहिती कार्यालय, परभणी