मुंबई, दि. २९ : राज्यातील काही खेळाडूंचे फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्याकारणाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाकरिता ते अर्ज सादर करू शकले नाहीत. त्यांचे नुकसान होऊ नये व हे खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये, याकरिता अशा पात्र खेळाडूंनी त्यांचे प्रस्ताव व विहीत नमुन्यातील अर्ज दि. ३१ मार्च, २०२३ पर्यंत संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
दि. १४ डिसेंबर, २०२२ च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील खेळाडू (ज्या खेळाच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात असे सहभागी/प्राविण्यप्राप्त खेळाडू फक्त) यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा विहीत नमुना https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन, डाऊनलोड करून घेऊन, व्यवस्थितरित्या भरुन संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावयाचा आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत दि. ३१ मार्च, २०२३ पर्यंत अशी ठेवण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या करण्यासाठी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील लिंकवर पहावे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्या-या खेळाडू, यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याबाबत क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
000000
राजू धोत्रे/विसंअ