सध्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कोल्हापुरातील पारंपारिक कट्टर विरोधी महाडिक विरुद्ध पाटील असा सामना रंगला असून सध्या अर्ज छाननी ची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, यामध्ये पोटनियमातील तरतुदीनुसार सत्ताधारी गटाकडून हरकती घेण्यात आल्या. यावेळी विरोधी गटातील २९ उमेदवार अपात्र ठरल्याने सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
सतेज पाटील यांनी आज अजिंक्यतारा कार्यालयात कार्यकर्ते आणि सभासदांच्या मेळावा घेत माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.सर्व गटात आमच्या परिवर्तन पॅनेलचे उमेदवार आहेत.कोणताही गट बिनविरोध होणार नाही. शिवाय २९ उमेदवार अपात्र ठरविण्याच्या हायकोर्टात आव्हान देणार आहे. चांगला कारभार केला तर रडीचा डाव का खेळता ? कुस्ती करायची होती मग पळपुटेपणा का करता ? कुस्ती लढायचे असेल तर मर्दासारखे लढा.रडीचा डाव खेळू नका. आजपर्यंत मी स्वत:साठी कधी लढा दिला नाही. मी गोकुळमध्ये संचालक झालो नाही.परंतु, महाडिकांनी गोकुळमध्ये स्वत:च्या कुटुंबातील माणसे घेतली. आता माघारीला दोन दिवस बाकी आहेत. महाडिकांच्या घरातील सगळ्यांनी उमेदवारी मागे घ्यावी. आता लढाई सरळ होऊ दे, सभासद न्याय देऊ देत आणि निर्णय घेऊ देत. कारखान्याचे २९ संचालक कोण असतील, याचा निर्णय १२ हजार सभासदांना घेऊ दे, असे सतेज पाटील म्हणाले असून कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखी लढा, बावड्याचा पाटील कधी मागे पडणार नाही. मी १४ तास राबणार आहे, आता २४ तास राबणार असल्याचा निर्धार सतेज पाटील यांनी केला आहे.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये माजी चेअरमन सर्जेराव माने, बाजीराव पाटील, उत्तम चव्हाण यांच्यासह विरोधी गटाच्या २१ उमेदवारांवर सत्ताधारी गटाकडून तर तानाजी कृष्णा पाटील या सत्ताधारी गटाच्या उमेदवारावर विरोधी गटाकडून हरकत घेण्यात आली होती. तसेच इतर तीन उमेदवारांबाबतही हरकत नोंदविण्यात आली होती. सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या वकिलांकडून हरकतींवर मंगळवारी जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. २३७ उमेदवारी अर्जांपैकी १० अपात्र ठरले होते. ३३ उमेदवारांच्या हरकतीवर रात्री उशिरा निर्णय घेण्यात आला. आज अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये पोटनियमातील तरतुदीनुसार एकूण २९ उमेदवार अपात्र ठरले आहेत.हा आमदार सतेज पाटील गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे.
राजाराम कारखान्याच्या अर्ज छाननीवेळी सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे सुद्धा प्रकार घडले. बनावट अर्ज करुन विरोधी उमेदवारांवर हरकत घेतली असा आरोप आमदार सतेज पाटील गटाकडून, तर विरोधकांकडून हकरतदारांवर दबाव टाकला जात असल्याची भूमिका महाडिक गटाने घेतली होती.सध्या सर्वसाधारण गटातील १५, महिला प्रतिनिधी गटातील २ तर संस्था प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि भटक्या विमुक्त गटातील प्रत्येकी एक अशा २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. संस्था गटाचे १२९ तर १३४०९ अ वर्ग सभासद असे १३५३८ सभासद मतदानासाठी पात्र आहेत. निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार, १२ एप्रिल हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. मात्र या निकालानंतर ही निवडणूक मोठ्या चुरशीने होणार असल्याचे दिसून येत आहे.
आता पुढील लढाई न्यायालयात : सतेज पाटील
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सतेज पाटील यांच्या गटाच्या २९ उमेदवारांचे अर्ज बाद केले आहेत. त्यामुळं सतेज पाटील यांनी उच्च न्यायालयात दात मागणार असल्याचं म्हटलं. सतेज पाटील यांच्या गटानं आमचं ठरलंय,यंदा कंडका पाडायचा ही टॅगलाईन घेऊन प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, अर्ज बाद ठरवले गेल्यानं सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे.