ते पहिल्यापासून म्हणतात ‘हू इज धंगेकर’ त्यांना माहीतच नाही धंगेकर कोण आहेच. पुण्याच्या प्रश्नावर बैठक सुरू होती, तेव्हा अचानक गणेश बिडकर तिथे आले, ते कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत, जर आमदारांना आमंत्रण होते तर त्यांनी मध्ये येऊन चर्चा केली ते योग्य वाटलं नाही. त्यामुळे मी तिथून निघून आलो. चंद्रकांत पाटील मला ओळखच देत नव्हते, माझ्याकडे बघतच नव्हते, त्यामुळे मला उठून यावं लागलं. असं धंगेकर म्हणाले आहेत. दरम्यान, चंद्रकांत दादांना वेळ असेल तर मी नक्कीच त्यांना घरी जेवायला बोलावणार कारण आपली दारं सगळ्यांसाठी उघडी असतात, असं देखील धंगेकर म्हणाले आहेत.
मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता. आजारपणामुळे मुक्ताताईंचं दिसणं, असणं, अस्तित्व हे संपलं होतं. त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा यांना मुक्ताताईंच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला, त्यामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता. त्यामुळे टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणालेत. यावरून देखील रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.
मुक्ताताई टिळक हे लोकमान्य टिळकांचे कुटुंब आहे. त्यांचा वारसा पुणेकरांना माहित आहे. पुणेकरांनी या कुटुंबाला सुरुवातीपासून डोक्यावर घेतलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन खर्ची घातले आणि अशा कुटुंबाबद्दल माझ्या मनात निश्चित आपुलकी आहे. मात्र त्यांच्या पक्षाला जो निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला असे धंगेकर म्हणाले आहेत.