श्रीगोंदा तालुक्यातून दररोज १ लाख ६० हजार लिटर दूध संकलन व्हायचे. प्रशासनाला बनावट दूध तयार होत असल्याची कुणकुण लागली. धाडी टाकताच बनावट दूध तयार करण्याचे साहित्य सापडले. मात्र, आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईनंतर तालुक्यातील दुधाचे संकलन थेट ६० हजार लिटर वर आले आहे. याचा अर्थ श्रीगोंद्यामध्ये दिवसाला १ लाख लिटर बोगस दूध संकलन होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
काष्टी येथील बाळासाहेब पाचपुते यांच्या डेअरी फार्मवर बनावट दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी उमेश सुर्यवंशी यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी बाळासाहेब पाचपुते फरार असून संदिप संभाजी मखरे, वैभव रामदास राऊत, दीपक विठ्ठल मखरे,निलेश तुकाराम मखरे, संदीप बबन राऊत, राहणार श्रीगोंदा, कैलास बाबाजी लाळगे (शिरूर जिल्हा पुणे), वैभव जयप्रकाश हांडे (उंब्रज जिल्हा पुणे), संजय तुकाराम मोहिते (पारगाव सुद्रिक), विशाल अशोक वागस्कर (सुरोडी), अनिल काशीनाथ कुदांडे (भानगाव) अशा दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
केमिकल पुरवणारा आरोपी फरार
श्रींगोदा येथे इतक्या मोठ्याप्रमाणावर दुधात भेसळ होत असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर प्रशासन आणि पोलीस स्तरावरुन कारवाईची सूत्रे वेगाने हालताना दिसत आहेत. परंतु, दुधात भेसळ करण्यासाठी केमिकल पुरवणारा संशयित अद्याप फरार आहे. आरोपींकडून राज्यातील आणख्या कोणत्या ठिकाणी दूध भेसळीसाठी केमिकलचा पुरवठा केला जात होता, याचीही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. दूध भेसळीच्या या रॅकेटमध्ये दुग्ध व्यावसायिक, दूध डेअरी, संघ यांच्याशी निगडीत अनेक व्यक्तींचा समावेश असल्याची शक्यता आहे. त्यामध्ये अनेक बड्या व्यक्तींचा समावेश असू शकतो. त्यामुळे दूध भेसळीचे रॅकेट चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणे हे पोलिसांसाठी आव्हान असल्याची चर्चा आहे.