मुंबई : राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल. महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वात जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूचक इशारा देण्यात आला आहे. मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची माफी मागण्यास राहुल गांधींना सुचवलं जात असतानाच त्यांनी ‘माफी मागायला माझं आडनाव सावरकर नाही, गांधी आहे’ असं म्हणत आगीत तेल ओतलं होतं. राहुल गांधी वारंवार बोलत आहेत की, मी घाबरत नाही. मला तुरुंगात डांबले तरी प्रश्न विचारत राहीन. राहुल गांधी हे घाबरत नाहीत व अदानी-मोदी संबंधांवर वारंवार प्रश्न विचारीत आहेत हे खरेच, पण राहुल गांधी यांनी स्वतःबरोबरच त्यांच्या संपूर्ण पक्षाला व देशालाही निर्भय बनविण्याची गरज आहे. ”माझे आडनाव सावरकर नाही” अशी विधाने वारंवार करून ही निर्भयता निर्माण होणार नाही व वीर सावरकर यांच्या बाबतीत जनतेच्या मनात असलेल्या श्रद्धेलाही तडा जाणार नाही. वीर सावरकर हे त्यांच्या जागी थोर आहेत. सावरकरांना अकारण ‘माफीवीर’ वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कुणाला मिळणार नाही, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, महाराष्ट्र काँग्रेसमधील बड्या नेत्याची मागणी
वीर सावरकरांनी इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी इंग्लंड व आपल्या देशातही योद्धे निर्माण केले, त्या योद्ध्यांनी जुलमी राज्यकर्त्यांवर ‘धाडधाड’ गोळ्या चालवल्या व त्या कृत्याबद्दल सावरकरांनी कधीच खेद व्यक्त केला नाही. सावरकरांनी ज्या प्रमाणे इंग्रजांविरुद्ध अनेक योद्धे उभे केले तसे प्रखर योद्धे राहुल गांधी यांना स्वतःच्याच पक्षात आधी उभे करावे लागतील. मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली हा अन्याय आहे, पण वीर सावरकरांची मानहानी करून ते ज्या सत्यासाठी लढू पाहत आहेत, त्या सत्याचा विजय होणार नाही, असंही अग्रलेखात लिहिलं आहे.तुम्ही भाजपसाठी थेट काम का करताय? थोडं फिरवून विचारा ना, राहुल गांधींनी पत्रकाराला झापलं
वीर सावरकर समजून घेण्यासाठी मोठे मन व वाघाचे काळीज पाहिजे. सावरकरांचा अवमान वा त्यांच्यावर चिखलफेक करण्यापूर्वी सावरकरांचे मोठेपण समजून घेतले तर स्वातंत्र्यवीरांची बेअदबी अथवा हेटाळणी करण्यास कोणीही धजावणार नाही. विद्यमान राजकारणात सावरकरांचे नाव ओढून त्यांना खुजे ठरवण्याचा प्रयत्न क्लेशदायक आहे. राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल. महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वात जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही, असंही राहुल गांधींना सामनाच्या अग्रलेखातून सुचवण्यात आलंय.