त्यांच्या परीक्षणांची शीर्षकं हा त्यांचा यूएसपी होता. आयएनटीच्या ‘अबक दुबक तिबक’ नाटकाला ‘धबक धबक धबक’ असे शीर्षक देऊन त्यांनी त्या नाटकाची पिसे काढली होती. अमोल पालेकरांच्या ‘राशोमान’ला त्यांनी ‘ठुंग फुस्स’ असे शीर्षक दिले होते (कारण मूळ कलाकृती जपानी होती.) रत्नाकर मतकरींनी लिहिलेल्या ‘माझं काय चुकलं?’ या नाटकाचं हेडिंग होतं, ‘तेच तर सांगतो’, म्हणजे काय ते समजून जायचं. श्री. ना. पेंडशांच्या ‘रथचक्र’ नाटकात मूळ कादंबरीची खोली कशी नाही हे त्यांनी तौलनिक दाखले देत मांडले होते.
‘चंद्रलेखा’च्या ‘स्वामी’ नाटकाचं त्यांनी ‘शनिवारवाड्याचा स्वामी’ आणि ‘रविवारवाड्याचा स्वामी’ असं दोन भागांत परीक्षण लिहिले होते. नाडकर्णींच्या तावडीतून कितीही मोठा लेखक, दिग्दर्शक, नट असला तरी तो सुटत नसे. कानेटकर, तेंडुलकरांनाही त्यांनी सोडलं नाही. त्यामुळे नाडकर्णींच्या नावाला एक वलय प्राप्त झाले आणि पुढे ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रुजू झाले.
यापूर्वी नाडकर्णी यांनी वृत्तपत्रीय समीक्षा कधी केली नाही. इथे त्यांना साप्ताहिकासारखी जागा नव्हती. पण त्यांनी आपली हूण आक्रमकांसारखी मुसंडी मारत लिहिण्याची वृत्ती सोडली नाही. त्यांनी आजवर शेकडो नाटकांवर लिखाण केले आहे. नाडकर्णींना अ. भा. मराठी नाट्य परिषदेने २०१९ सालचा जीवन गौरव सन्मान देऊन त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान केला होता.
मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
नाटक क्षेत्रातील समीक्षेला वृत्तपत्रीय प्रतिष्ठा आणि न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने नाट्य समीक्षा क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना, अशी शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.