मुंबई, दि.11 : स्वायत्त महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांनी इतर महाविद्यालयांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याबरोबरच जागृती करण्याचे काम करावे. या माध्यमातून राज्यातील शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करावी. यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट कॅम्पस मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीकरिता सुकाणू समितीसमवेत स्वायत्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. पाटील बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव, सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर, स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, प्रत्येक महाविद्यालयाने माजी विद्यार्थी व सामाजिक उत्तरदायित्व निधीतून स्वायत्तता निर्माण करावी. स्वायत्त महाविद्यालयांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना आणखी पाच महाविद्यालयांना या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तयार करावे. गुणवत्ता राखण्यासाठी नॅक मूल्यांकन महत्त्वाचे आहे.त्यामुळे ज्या महाविद्यालयांना नॅकचे मानांकन मिळाले आहे, अशा महाविद्यालयांनी इतर महाविद्यालयांना नॅक मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.
आज जागतिक स्तरावर भारताचे नाव आदरपूर्वक घेतले जाते. विविध क्षेत्रात महत्त्वाच्या प्रमुख पदावर भारतीय वंशाच्या व्यक्ती कार्यरत आहेत. देशाचे नाव जागतिक स्तरावर नंबर एकवर राहण्यासाठी शैक्षणिक धोरणातील बदल महत्त्वाचे आहेत. देशातल्या उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तनात्मक सुधारणेचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांनी जबाबदारी घेऊन प्रेरणा जागृत करण्याचे काम करावे असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.
या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर यांनी केले. यावेळी पनवले, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आदी स्वायत्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सादरीकरण केले.