मुंबई,दि.11 : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीची आढावा बैठक समितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट कॅम्पस मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) डॉ. शैलेंद्र देवळाणकर, समितीचे सदस्य सचिव डॉ. संजय शिंदे, शिवा कांबळे, डॉ. मिलिंद कसबे, डॉ. सोमनाथ कदम, डॉ.प्रमोद गारुडे, डॉ. विजय कुमठेकर, डॉ.बळीराम गायकवाड आदी उपस्थित होते.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित चित्रमय पुस्तक, समीक्षा ग्रंथ आणि जीवन पट निर्मिती करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्यावतीने तयार करण्यात येत असलेल्या ग्रंथाचे लवकरात लवकरात प्रकाशन करण्यात येईल. तसेच समितीच्या कार्यालयासाठी जागेची उपल्बधता करण्यात येईल, असे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
समितीचे सदस्य सचिव डॉ.संजय शिंदे यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने तयार करण्यात येत असलेल्या चार खंडाचे काम पूर्णत्वास येत आहे. तसेच या खंडाचे ऑडिओ आणि ई-बुक तयार करण्यात येत असल्याची माहिती दिली.