• Mon. Sep 23rd, 2024

महिला विकास, पर्यटनाला चालना देणारा अर्थसंकल्प – मंत्री मंगल प्रभात लोढा

ByMH LIVE NEWS

Mar 9, 2023
महिला विकास, पर्यटनाला चालना देणारा अर्थसंकल्प – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ९ : राज्य शासनाच्या वतीने सन २०२३-२४ साठी मांडलेला अर्थसंकल्प महिला विकास, पर्यटनाला चालना देणारा आणि रोजगार निर्मितीला भर देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया महिला व बालविकास,पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्ष साजरे केले जाणार आहे. या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटी, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने यासाठी 250 कोटी रुपये, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय, शिवकालीन किल्ले संवर्धनासाठी 300 कोटी रूपयांची तरतूद केली आहे, असे त्यांनी सांगितले.

पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास करण्यात येईल. महत्त्वाच्या 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारण्यात येईल. पर्यटन विभागाने कॅलेंडर वर आधारित पर्यटन उपक्रम सुरू केले आहेत. त्याच अंतर्गत राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार असून यात शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव, जव्हार, वीर बाल दिवस महोत्सव नांदेड इत्यादींचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात देण्यात आली आहे. महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट देण्यात आली असून चौथे सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच जाहीर केले जाणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर,मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी,औषधोपचार करण्यात येणार आहेत, ही बाब अतिशय उल्लेखनीय आहे.

शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती, महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्यात येणार असून या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन सेवा देण्यात येनार आहेत. एकूणच महिलांचा सर्वांगीण विकास आणि पर्यटनातून रोजगार निर्मिती वाढण्यास या अर्थसंकल्पातून मदत होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed