• Sun. Sep 22nd, 2024

राज्यपालांनी सांगितल्या आपल्या कौशल्य शिक्षणाच्या आठवणी

ByMH LIVE NEWS

Mar 7, 2023
राज्यपालांनी सांगितल्या आपल्या कौशल्य शिक्षणाच्या आठवणी

मुंबई दि. ७ : प्रत्येक व्यक्तीमध्ये निसर्गदत्त काही ना काही प्रतिभा असते. या प्रतिभेला कौशल्य व ज्ञानाची जोड मिळाल्यास मनुष्य कोणत्याही वयात मोठी प्रगती करू शकतो असे सांगून रात्र शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यवसायासाठी नाही तर ज्ञानवर्धनासाठी तरी शिकावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

राज्यपाल रमेश बैस यांनी सोमवारी (दि. ६) मुंबईतील सांताक्रुझ येथील उपनगर शिक्षण मंडळातर्फे संचालित विकास रात्र विद्यालयाला भेट दिली व काम करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी घरोघरी वर्तमानपत्र टाकले, रस्त्यांवरील दिव्याखाली बसून अभ्यास केला आणि पुढे मोठे वैज्ञानिक झाले, असे सांगताना दिवसभर काम करून तसेच कुटुंब चालवून रात्र विद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यपालांनी कौतुकाची थाप दिली.

प्राप्त केलेले कौशल्य, ज्ञान जीवनात कोठेही कामात येते असे सांगताना राज्यपालांनी आपण वयाच्या १५ व्या वर्षांपासून काष्ठशिल्पकला, लाकडावरील कोरीव काम तसेच चित्रकला शिकल्याचे सांगितले. त्याशिवाय मोटार कार दुरुस्ती करावयास देखील आपण शिकून घेतल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

अनेक शाळांमध्ये पालकांची आर्थिक स्थिती पाहून पाल्याला शाळेत प्रवेश दिला जातो याबद्दल खेद व्यक्त करताना गरीब विद्यार्थ्यांसाठी रात्र शाळा चालवून निःशुल्क शिक्षण देत असल्याबद्दल राज्यपालांनी उपनगर शिक्षण मंडळ तसेच संस्थेचे अध्यक्ष व नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

यावेळी रात्र शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रहास देशपांडे, मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, विकास रात्र विद्यालयाचे प्राचार्य दीपक कोतेकर, शिक्षक, विदयार्थी व आश्रयदाते उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते रात्रशाळेत शिक्षण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  पारस इंटरमिजिअरीस लिमिटेड या उद्योग संस्थेच्या वतीने निलेश व जिगर यांनी रात्र शाळेला विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप भेट दिले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed