• Sun. Sep 22nd, 2024

मराठी पुस्तकांना जागतिक पुस्तक मेळ्यात चांगली मागणी

ByMH LIVE NEWS

Mar 4, 2023
मराठी पुस्तकांना जागतिक पुस्तक मेळ्यात चांगली मागणी

नवी दिल्ली, दि. 4  :  मराठी पुस्तकांना जागतिक पुस्तक मेळ्यात चांगली मागणी असल्याचे चित्र पुस्तक मेळ्यात दिसले.

येथील प्रगती मैदान येथे राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) यांच्या पुढाकाराने सध्या ‘जागतिक पुस्तक मेळा 2023’ सुरू आहे. येथील हॉल क्रमांक 4, 5 येथे आणि पहिल्या मजल्यावर लहान मोठी अनेक पुस्तकांची दालने आहेत. हा पुस्तक मेळा 25 फेब्रुवारीला सुरू झाला असून उद्या रविवार 5 मार्चला याची सांगता होणार आहे. यावर्षी पुस्तक मेळयाची संकल्पना आज़ादी का अमृत महोत्सव अशी आहे. तसेच या पुस्तक मेळयात फ्रांस भागीदार राष्ट्र आहे.  याठिकाणी हिंदीसह इंग्रजी, मराठी आणि अन्य भाषेतील पुस्तके आहेत.

याठ‍िकाणी सकाळ प्रकाशन, जोत्स्ना प्रकाशन, विश्वकर्मा प्रकाशन, माय मिरर प्रकाशन, वाणी प्रकाशन, अटलांटा प्रकाशनाच्या दालनांमध्ये मराठीसह अन्य भाषेतील पुस्तके मांडण्यात आलेली आहेत. पुस्तकांमध्ये मराठी साहित्य, आध्यात्म‍िक पुस्तके आणि स्वयंविकासाची पुस्तके अधिक प्रमाणात खरेदी केली जात असल्याची माहिती प्रकाशकांनी दिली.

राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या मुख्य दालनात यावर्षीच्या संकल्पनेवर स्वातंत्र्य चळवळीत योगदान असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे तसेच स्वातंत्र्यानंतर आधुनिक भारताची रचना करणाऱ्या महानायकांच्या पुस्तकांची आकर्षक मांडणी करण्यात आलेली आहे. यासह एनबीटीच्या अन्य दालनात बालकांपासून ते वयोवृद्धापर्यंत मराठीची  वाचनीय पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

शुक्रवारी ‘सकाळ प्रकाशन’ तर्फे ज्येष्ठ लेखिका मेधा देशमुख भास्करन यांच्या ‘अप अगेंस्ट डार्कनेस’ या   इंग्रजी  पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या स्नेहालय या शरीर विक्रय करणाऱ्या महिलांसाठी केलेल्या कार्यावर आधारित आहे. यावेळी श्रीमती भास्करन यांनी त्यांचे पुस्तक महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed