• Mon. Nov 25th, 2024

    ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीला होईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ByMH LIVE NEWS

    Feb 28, 2023
    ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीला होईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. २८ : ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या इतिहासाची माहिती मिळेल. २८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत सोडून येथून गेली. गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

    गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ चा उद्घाटन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री (पेट्रोलियम व नैसर्गिक वायू) हरदीप सिंह पुरी यांनी लाईट अँड साऊड शो शुभारंभ प्रंसगी व्हिडीओ संदेश द्वारे शुभेच्छा दिल्या.

    पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य, निदेशक (विपणन) इंडियन ऑइल व्ही. सतीश कुमार, पर्यटन संचालनालयचे संचालक, डॉ. बी. एन. पाटील यावेळी उपस्थित होते. भारतीय नौदलाच्या वाद्य वृंदावन राष्ट्रगीत, राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत सोडून गेली. ‘गेट वे ऑफ इंडिया’ चा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीकोनातून देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशभरात अनेक कार्यक्रम साजरे केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथे ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ सुरु करण्यात येत आहे. ब्रिटीश सैन्याच्या भारतातून शेवटच्या प्रस्थानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आजपासून मीडिया अँड साऊंड शो’ आयोजित केला आहे याचा मुंबईतील नागरिक लाभ घेतील.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेट वे ऑफ इंडिया मुंबईतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. इंडियन ऑईल कंपनीने हा शो आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचेल. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आणि पर्यटन विभागाचे खूप खूप अभिनंदन करतो त्यांनी कमी वेळात हे काम पूर्ण केले आहे. मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हा लेझर शो उत्कंठावर्धक वाटला पाहिजे यासाठी विभागाने प्रयत्न करावा. मल्टीमीडिया लाईट अँड साऊंड शो मध्ये नाविन्यपूर्णता राहील याची पर्यटन विभागाने खबरदारी घ्यावी.

    मल्टी मीडिया अँड साऊंड शोइंडियन ऑईलमार्फत सुरू होत आहे ही अभिमानाची गोष्ट : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी

    केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले, दिनांक २८ फेब्रुवारी, १९४८ रोजी ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी (The Somerset Light Infantry) भारत भूमी सोडून गेली. या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आज दिनांक २८ फेब्रुवारी, २०२३ रोजी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मुंबई शहराची जगात एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख आहे. संपूर्ण जगभरातील पर्यटक शहराला वर्षभर भेटी देत असतात. गेट वे ऑफ इंडियाच्या वैभवात भर टाकण्यासाठी पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय केंद्र शासन यांच्या समवेत झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ इंडियन ऑईलमार्फत पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

    आता गेटवे ऑफ इंडिया इंग्रज भारतातून परत गेले या घटनेने ओळखले जाईल : पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

    पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, गेटवे ऑफ इंडियातून इंग्रज भारतात आले होते असा इतिहास आपण ऐकलेला आहे पण आजच्या मल्टीमीडिया अँड साऊंड शो कार्यक्रमामुळे भारतातून शेवटचे इंग्रज बटालियन परत गेले हे सर्व भारतीयांना कळेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही मूळ संकल्पना आहे. आज हा कार्यक्रम सुरू करताना मला खूप आनंद होत आहे. इंडियन ऑईलचे याबद्दल मी खूप आभार मानतो. आज पासून दर शनिवारी आणि रविवारी हा शो सुरु राहणार असून यापुढे तो नियमितपणे दररोज सुरू ठेवण्यात येईल, असेही पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले.

    इंडियन ऑल देशातील प्रत्येक माणसाशी जोडलेली आहे : श्रीकांत माधव वैद्य

    इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य म्हणाले, इंडियन ऑइल देशातील प्रत्येक माणसाशी जोडली गेलेली आहे. व्यापाराच्या पुढे जाऊन पर्यावरण संवर्धनासाठी इंडियन ऑईल काम करत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये इंडियन ऑईल मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे मल्टीमीडिया अँड साऊंड शो च्या माध्यमातून जोडली गेली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. येथे आयोजित केलेले शो प्रगतीशील भारत या थीमवरती आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा शो मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेत असून हेडसेट घातल्यानंतर जापनीज, जर्मन, फ्रेंच, रशियन या भाषेतून देखील ऐकता येणार आहे.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *