• Mon. Nov 25th, 2024

    बोरिवली रोजगार मेळाव्यात ७,१३८ पदांकरीता विविध कंपन्या, उद्योगांनी घेतल्या मुलाखती

    ByMH LIVE NEWS

    Feb 25, 2023
    बोरिवली रोजगार मेळाव्यात ७,१३८ पदांकरीता विविध कंपन्या, उद्योगांनी घेतल्या मुलाखती

    मुंबई, दि. २५ : कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बोरीवली येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध उद्योग, कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्थांनी त्यांच्याकडील ७ हजार १३८ पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मेळाव्यात साधारण ५२९ उमेदवारांनी सहभाग घेतला, त्यातील ३७३ उमेदवारांची विविध पदांसाठी प्राथमिक निवड झाली असून १८ उमेदवारांची अंतिम निवड झाली आहे. मेळाव्यात ३३ उद्योग तथा कंपन्यांनी सहभाग घेतला. आज सकाळी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला.

    बोरिवली येथील सेंट फ्रान्सिस अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त मुकेश संखे, माजी नगरसेवक जगदीश ओझा, जितेंद्र पटेल, हरीश छेडा यांच्यासह गणेश खामकर, दिलीप पंडित, निखिल व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.

    ५ लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा

    मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने ७५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये ३०० रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

    मेळाव्यात सुमित फॅसिलिटीज लिमिटेड, स्पॉटलाईट, एनआयएसए सिक्युरिटीज, पियानो प्रेसिडेल, मॅजिक बस इंडिया फाउंडेशन, कल्पवृक्ष, जस्ट डायल, डीएसटीए एज्युकेशन फाउंडेशन, राज सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, कॅटलिस्ट टॅलेंट मॅनेजमेंट, थॉमस रिक्रुटमेंट सोल्युशन, सब्र रिक्रुटमेंट, टेलीएक्सेस बीपीओ, पवार एंटरप्राइजेस, फन अँड जॉय ऍट वर्क, एलआयसी ऑफ इंडिया, कोटक एज्युकेशन फाउंडेशन, टाटा स्ट्राईव्ह, हिंदू रोजगार डॉट कॉम आदी विविध कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील विविध रिक्त पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याचबरोबर मेळाव्यात विविध शासकीय मंडळेही सहभागी झाली. त्यांनी स्वयंरोजगारासाठी असलेल्या त्यांच्याकडील विविध कर्ज योजनांची माहिती यावेळी उमेदवारांना दिली.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *