मुंबई, दि. १६ : गेल्या अनेक वर्षांपासून ‘आय लव्ह मुंबई’ उपक्रमांतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी ‘द प्लान्ट फेस्टिव्हल’ हा स्तुत्य उपक्रम असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
मुंबईत दररोज नवीन उपक्रम राबविण्यात येत असतात, पण या पर्यावरण संवर्धन उपक्रमाला उपस्थित राहता आल्याचा आनंद आहे. हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबवत असल्याबद्दल शायना एन. सी. यांचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी अभिनंदन केले.
लोअर परळ येथील फिनीक्स मॉल येथे शायना एन. सी. आणि नाना चुडासामा यांच्या ‘आय लव्ह मुंबई’ उपक्रमांतर्गत ‘द प्लान्ट फेस्टिव्हल’मध्ये विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील उपस्थित होते.
यावेळी ॲड. नार्वेकर म्हणाले की, या फेस्टिव्हलमुळे मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना निसर्गाची ओळख होण्यास मदत होईल. शिवाय हा उपक्रम अधिक लोकाभिमुख व्हावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.
16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून यामध्ये विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
यावेळी शायना एन. सी. यांच्यासह सुनील देशपांडे, आयपीएस अधिकारी क्वॉयसर खालिद, मिकी मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
०००
वर्षा आंधळे/विसंअ/