• Tue. Nov 26th, 2024

    महापालिका, शासन मिळून उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Feb 15, 2023
    महापालिका, शासन मिळून उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ठाणे, दि. १५ (जिमाका) – उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

    उल्हासनगर महानगरपालिकेच्या खडे गोळवली येथील मलशुद्धीकरण केंद्र, ग्रीन उल्हास ई चार्जिंग केंद्र, श्वान निर्बिजीकरण केंद्र, दिव्यांगासाठी संगणक प्रणाली, प्लॅस्टिक क्रशिंग मशीन या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.  उल्हासनगरमधील सेंच्युरी मैदानात आयोजित या कार्यक्रमास  केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील,  कल्याण- डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, आमदार सर्वश्री  ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे, गणपत गायकवाड, डॉ. बालाजी किणीकर, कुमार आयलानी,  जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख, आदी यावेळी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सामान्य जनतेच्या सरकारच्या माध्यमातून लागेल ती मदत केली जाईल. रस्ते, पाणी, दिवाबत्ती आणि शहराची स्वच्छता यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. या राज्यामध्ये सर्व सामान्य लोकांना काय पाहिजे ते लक्षात घेऊन सरकार काम करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा राज्याच्या विकासासाठी आहे.  म्हणून हे सरकार या राज्याचा सर्वांगीण विकास अतिशय वेगाने करत आहे. आम्ही सर्वजण राज्याच्या हिताचे निर्णय घेतोय. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्व शहरांसाठी जे जे काय आवश्यक आहे ते देण्याचं काम आम्ही करतोय.

    उल्हासनगरमधील जुन्या व धोकादायक  इमारतींच्या  पुनर्विकासामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी सगळे अडथळे दूर करण्यासाठी नियमांमध्ये देखील बदल केला आहे. त्याचा शासन निर्णय लवकरच प्राप्त होईल. उल्हासनगर शहराला ५० एम एल डी पाण्याची आवश्यकता आहे, ही पाण्याची कमतरता देखील राज्य शासन पूर्ण करेल. मोठे रस्ते, पिण्यासाठी पाणी, दिवाबत्ती, गार्डन या मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम  महापालिका आणि राज्य सरकार दोन्हीच्या माध्यमातून करत आहे. या शहराचा सुनियोजित विकास होईल मोठे रुंद रस्ते होतील, गार्डन होईल, प्लेग्राउंड होईल, आरोग्य सुविधा होतील, चांगल्या शाळा होतील, दवाखाने होतील हे सगळं होईल आणि उल्हासनगरातील रहिवाशांचे  जीवनमान उंचावेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, उल्हास नगरच्या विविध उपक्रमांमुळे विकास होईल. येथील रस्ते, घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.

    आयुक्त श्री. शेख यांनी प्रास्ताविकात विविध उपक्रमांची माहिती दिली.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed