ठाणे, दि. १५ (जिमाका) : कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराशी जिव्हाळ्याचे नाते आहे. या शहरासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. कल्याण पश्चिम व कल्याण पूर्वेमध्ये दोन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारावे, यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू. तसेच कल्याणकरांची मेट्रोची मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन मेट्रो१२ चा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे सरोवर (शेनाळे तलाव) सुशोभिकरण, मलशुद्धीकरण केंद्र आंबिवली, मलशुध्दीकरण केंद्र वाडेघर (कल्याण प.) व बी. एस. यु. पी. अंतर्गत बांधलेल्या सदनिकांचे प्रकल्प बाधितांना वाटप आदी विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणमधील यशवंतराव चव्हाण मैदानात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील, कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे, गणपत गायकवाड, विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. भाऊसाहेब दांगडे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रबोधनकार ठाकरे तलाव उर्फ भगवा तलाव (काळा तलाव) याचे नूतनीकरण कामाचे लोकार्पण मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर चे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कल्याणमधील भगवा तलाव हा ऐतिहासिक आहे. या ठिकाणी ज्या सुविधा करता येतील त्या करावेत. कल्याण एक ऐतिहासिक शहर आहे. मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवरचा कल्याण डोंबिवली हा सगळा परिसर आता वाढत आहे. मुंबईतले लोक ठाण्याकडे आणि ठाण्यातले लोक कल्याण डोंबिवली मध्ये येत आहेत. येथील लोकांसाठी परवडणारी घर मिळाली पाहिजे. घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि म्हणून ते देण्याचं काम आज कल्याण डोंबिवलीमध्ये झालं आहे. मुंबई ठाण्यासारख्या मोठ्या शहरांप्रमाणे कल्याण डोंबिवलीसह एमएमआरला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे ही आपली भूमिका आहे.
यावर्षी केंद्राचं अर्थसंकल्प चांगला झाला. राज्याच्या नगर विकास विभागाने केंद्राला जो प्रस्ताव पाठवला त्यातला एकही रुपया कमी केला नाही. पूर्ण पंधरा हजार कोटी रुपये दिले. तसेच राज्यातील रेल्वे प्रकल्पांना 13 हजार 500 कोटी रुपये दिले आहेत. राज्यातील साखर उद्योगांना दहा हजार कोटीची सवलत दिली आहे. केंद्राप्रमाणे राज्याचा देखील अर्थसंकल्प होणारा चांगलाच होईल. लोकांच्या भल्याचा, हिताचाच अर्थसंकल्प होईल. यामध्ये देखील सर्वसामान्य माणसाचा प्रतिबिंब दिसेल. राज्यातल्या सर्वसामान्य शेतकरी, कामगार, वारकरी, कष्टकरी, विद्यार्थी, शिक्षक,माता-भगिनी यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, समाधानाचे दिवस आले पाहिजे, त्यांच्या आयुष्यातली संकट दूर झाली पाहिजे हेच आम्ही प्रार्थना करत असतो. या राज्यावरच अरिष्ट आहे संकट आहे ते दूर झाले पाहिजे, बळीराजा सुखी झाला पाहिजे, म्हणून अनेक निर्णय आम्ही घेतले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते देखील खड्डे मुक्त करू. चांगले रस्ते, दिवाबत्ती, पाणी, उद्यान हे लोकांचा अधिकार आहे. या धकाधकीच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी चांगलं चांगल्या मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम हे स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारचा आणि म्हणून या ठिकाणी देखील जे जे काय आपल्याला देता येईल ते नक्की दिलं जाईल. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छांमुळे बाळासाहेबांच्या दिघे साहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री झालोय त्यामुळे हक्काचा मुख्यमंत्री तुम्हाला निधी देईन, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत बीएसयूपीच्या घरे वाटप होत आहे हा आनंदाचा क्षण आहे. ही घरे चांगली असून येथे सर्व सुविधा आहेत. कल्याणमध्ये मोठमोठी कामे सुरू आहेत. दुर्गाडी पूल, पत्री पूल, ऐरोली काटाई रस्ता अशी मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरू आहेत, या कामांमुळे प्रवास सुखकर होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या प्रकारे मोठे प्रकल्प येतील. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी मदत करू.
केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, राज्य सरकार व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. भगवा तलावाच्या सुशोभिकरणमुळे कल्याणच्या वैभवमध्ये भर घालण्याचं काम केलेलं आहे. अथक प्रयत्नांनंतर बीएसयुपीची घरं आज कल्याणकरांच्या सेवेत आली आहेत. यापुढील काळात कल्याणमधील कुठलाही रस्ता हा डांबरी राहणार नाही सर्व रस्ते हे काँक्रीटचे होतील.
यावेळी आयुक्त डॉ. दांगडे यांनी विविध प्रकल्पाची माहिती दिली.
000