• Tue. Nov 26th, 2024

    उष्णतेच्या लाटांमुळे होणाऱ्या परिणामांची शास्त्रशुद्ध माहिती गोळा करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत

    ByMH LIVE NEWS

    Feb 13, 2023
    उष्णतेच्या लाटांमुळे होणाऱ्या परिणामांची शास्त्रशुद्ध माहिती गोळा करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत

    मुंबई, दि. 13 :- जागतिक हवामान बदलामुळे उष्ण लहरींचे प्रमाण वाढत असून जीविताला होणारा धोका वेळीच रोखणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शास्त्रशुद्ध माहितीचे संकलन, प्रभावी उपाययोजना शासनस्तरावरुन राबविणे शक्य होईल, असे मत उष्ण लहरींबाबत आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत मांडण्यात आले.

    जागतिक हवामान बदलामुळे उष्ण लहरींचे प्रमाण वाढत असून त्यावर उपाययोजनांसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन आयआयटी, पवई येथे करण्यात आले असून पहिल्या सत्रात, हवामान बदलाचा प्रभाव आणि उष्णतेच्या लहरींच्या अनुकूलतेची आव्हाने तसेच उष्णतेच्या लहरींचा आरोग्यावर परिणाम आणि उपाय या विषयांवर चर्चासत्र झालीत. विविध तज्ज्ञांसमवेत, विविध राज्यांतील शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    उष्ण मोसमात अचानक वाढणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीवरुन उष्णतेचा घातक परिणाम शरीरावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या होताना दिसत आहे. मृत्यूच्या कारणांची माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून उष्माघातावरील उपाययोजना आखण्यास मदत होणार असल्याचे, आयआयटीचे प्रा.डॉ. महावीर गुलेचा यांनी सांगितले.

    उष्णतेच्या लहरी अथवा उष्माघाताने होणारे मृत्यू हे पूर्वापार सुरू असून, अलिकडेच त्याची अधिक गांभिर्याने दखल घेण्यात येत आहे. जागतिक हवामान बदलामुळे उष्माघात वाढत असून मनुष्य व वन्यजीवांवर याचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे मत यावेळी तज्ज्ञांनी मांडले.

    उष्माघातामुळे आरोग्य, अर्थव्यवस्था, शिक्षण अशा विविध घटकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असून, उष्माघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनासह लोकांनी सहभाग घेणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणात मृत्यूची संख्या वाढू शकते असे सांगून यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

    शासनाने विविध स्तरावर प्रबोधन आणि जागृती करणे गरजेचे आहे. हवामान केंद्राची संख्या वाढविणे, आजाराची कारणे शोधून उष्माघाताचा मनुष्याच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, याचे निदान करून, त्यासंदर्भात डेटा तयार करून, तो सर्वांसाठी उपलब्ध करणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सहआयुक्त प्रशांत कांबळे यांनी मनुष्याला उष्माघाताचा जसा त्रास होतो तसाच प्राण्यांनाही होत आहे. यासाठी योग्य पाणीपुरवठा, शेड, औषध, आरोग्याची काळजी आणि उष्ण वातावरणात कामे करून घेऊ नयेत अशा विविध उपाययोजनांची माहिती दिली.

    ‘हीट ॲक्शन प्लान’ ची अंमलबजावणी करणे, पूर्वसूचना देणारी यंत्रणा अधिक अत्याधुनिक करणे, घरासाठी योग्य तापमान तयार होईल असे रंग वापरणे, इमारतींना काचा वापरणे टाळणे, फूल रुफ टेक्नॉलॉजीचा वापर करणे, कर्नाटकप्रमाणे वेदर स्टेशनचा इतर राज्यांनी वापर करावा, आरोग्य क्षेत्राचे बळकटीकरण करण्यात यावे, स्थानिक संस्थेच्या सहकार्याने शासनाने विविध उपाययोजनात्मक कार्यक्रम राबविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

    या सत्रात एनडीएमए चे सहसचिव कुणाल सत्यर्थी, आयएमडीचे महासंचालक डॉ. अजित त्यागी, एनडीएमएचे सदस्य डॉ. कृष्णा वात्सा, सदस्य सचिव कमल किशोर, आयआयटीचे प्रो. कपिल गुप्ता, प्रो. महावीर गुलेचा, पब्लिक हेल्थेचे सुरेश राठी यांनी चर्चासत्रात भाग घेतला.

    ००००

    श्रद्धा मेश्राम/ससं/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed