• Mon. Nov 25th, 2024

    विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

    ByMH LIVE NEWS

    Jan 25, 2023
    विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. 25: परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे. त्याचप्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकलेसह इतर उपक्रमांमध्येही सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे राष्ट्रनिर्माण कार्यात त्यांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले.

    ‘परीक्षा पे चर्चा’ पर्व 6 या उपक्रमाअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यांतील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी आर्यन एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय, गिरगाव, मुंबई या शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

    या स्पर्धेमध्ये मुंबई विभागातील शिक्षण निरीक्षक पश्चिम विभागातील ६३१ शाळेतील २३ हजार ९६७ विद्यार्थी, शिक्षण निरीक्षक उत्तर विभागातील ४३० शाळेतील ५८९० विद्यार्थी, शिक्षण निरीक्षक दक्षिण विभागातील १३० शाळेतील २७२८ विद्यार्थी, ठाणे जिल्ह्यातील ६५६ शाळेतील १७ हजार ८७६ विद्यार्थी, रायगड जिल्ह्यातील ५७३ शाळेतील ९८८८ विद्यार्थी व पालघर जिल्ह्यातील ३३७ शाळेतील ८६४७ विद्यार्थी असे एकूण २७५७ शाळेतील ६८९९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती मुंबई विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली. यावेळी शिक्षण निरीक्षक देविदास महाजन उपस्थित होते.

    या चित्रकला स्पर्धेकरिता देण्यात आलेल्या विषयांमध्ये G-२० जागतिक विश्वगुरु बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, आझादी का अमृत महोस्तव, सर्जिकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणमध्ये भारत नं. 1, प्रधानमंत्री जनसेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योगदिन मोदीजीनी वेधले जगाचे लक्ष, बेटी बचाओ, बेटी पढाओ, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला मोदींचा संवेदनशील निर्णय, हे विषय देण्यात आले होते.

    या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना व उत्तेजनार्थ पंचवीस विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

    000

    वर्षा आंधळे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *