• Mon. Nov 25th, 2024

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करा

    ByMH LIVE NEWS

    Jan 21, 2023
    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करा

    मुंबई, दि. २१ : विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २७ जानेवारी  रोजी सकाळी ११ वा. विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ याविषयावर थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रत्येक शाळेत थेट प्रसारण करावयाचे असून शिक्षण विभागाने त्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी आज केली.

    मंत्री श्री. केसरकर यांनी आज सकाळी बालभवन, मुंबई येथून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह शिक्षण विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते, शिक्षण आयुक्त सुरजकुमार मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

    मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले, की ‘परीक्षा पे चर्चा’ च्या पार्श्वभूमीवर राज्यात २५ जानेवारी  रोजी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. या स्पर्धेचेही नियोजन शिक्षण विभागाने करून अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत. या चित्रकला स्पर्धेसाठी विविध दहा विषय असतील. या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांसह दहा उत्तेजनार्थ व २५ इतर विशेष बक्षिसे देण्यात येतील. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकांनाही निमंत्रित करावे, असेही त्यांनी सांगितले.

    यावेळी प्रधान सचिव श्री. देओल यांनी सांगितले की, शिक्षणाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चित्रकला स्पर्धेचे परिपूर्ण नियोजन करावे. या स्पर्धेसाठी अडीच तासांचा वेळ असेल. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून त्यांची ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी.

    यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षण आयुक्त श्री. मांढरे, संचालक श्री. दिवेगावकर यांनी सहभाग घेतला.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed